विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पुणे शहरामध्ये काँग्रेसमधील नेत्याविरोधात नाराजी दर्शवणारे फ्लेक्स झळकलेत, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. फावड्याशेठ नावाने हे बॅनर झळकले आहेत.
फावड्याशेठ, पांढरे कपडे घातले म्हणून काळा पैसा पांढरा होत नाही, सपकाळांबरोबर फिरलास तरी सज्जन होत नाही, पक्षाला विकून कायम पैसे गोळा केले. सच्चा कार्यकर्त्यांचे वाटोळे केले, आपला फावड्याशेठला माझं नाव माहित आहे, असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला आहे.
महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीतील नाराजी या बॅनरमागे असल्याचे बोलले जात आहे. पुणे शहर काँग्रेसमधील वरिष्ट नेत्याकडे अंगुलीनिर्देश असून त्यांचे राज्य नेतृत्वाशी चांगले संबंध आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून आता काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आलेला आहे. वरिष्ठ नेते पैसे घेऊन स्वीकृत नगरसेवक पद, तिकिटे आणि कार्यकारिणीतील पदे विकत असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर हे बॅनर झळकले आहेत.
कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार झालेले रवींद्र धंगेकर यांनी पक्षांतर्गत कुरबुरीना कंटाळून पक्ष सोडला. त्याचबरोबर काँग्रेसचे दुसरे नेते रोहित टिळक यांनीही काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या नेत्याने गेल्या अनेक वर्षांपासून शहर काँग्रेस ताब्यात ठेवली आहे, असा आरोप केला जात आहे.
Discontent in Pune Congress Over Nominated Corporator Selection; ‘Favadya Sheth’ Banners Target Senior Leader
महत्वाच्या बातम्या