विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पश्चिम आशियातील अमेरिका–इस्रायल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत देशांतर्गत राजकारण तापले असतानाच काँग्रेसच्या दोन वरिष्ठ खासदारांनी केंद्राच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. काँग्रेस नेते डॉ. शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनी केंद्राच्या ‘मोजक्या आणि संतुलित’ भूमिकेचे समर्थन करत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. Congress MP
डॉ. शशी थरूर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मौन बाळगणे हे भ्याडपणाचे लक्षण नसून ती एक परिपक्व राजनैतिक रणनीती असू शकते.” त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’मधील लेखात नमूद केले की, पश्चिम आशियातील संघर्ष अत्यंत गुंतागुंतीचा असून अशा परिस्थितीत सर्व बाजूंशी संतुलन राखणे गरजेचे असते. आंतरराष्ट्रीय कायदा, सार्वभौमत्व आणि शांततापूर्ण तोडगा या तत्त्वांवर भारत ठाम आहे, मात्र परराष्ट्र धोरण हे केवळ घोषणाबाजीवर चालत नाही, तर त्यात राष्ट्रीय हितसंबंधांना प्राधान्य दिले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, खासदार मनीष तिवारी यांनीही केंद्राच्या सावध भूमिकेचे समर्थन करत म्हटले की, “मध्यपूर्वेत एकच नव्हे तर अनेक स्तरांवर संघर्ष सुरू आहेत. हे आपले थेट युद्ध नाही. त्यामुळे भारताने सामरिक स्वायत्तता जपत आपल्या हितांचे संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, भारताने आतापर्यंत मध्यपूर्वेत मर्यादित पण संतुलित भूमिका घेतली असून तीच पुढेही कायम ठेवणे आवश्यक आहे.
या संघर्षावर भारताने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत होती. काही दिवस केंद्र सरकारने मौन बाळगल्याने सरकारवर टीका झाली होती. मात्र आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच या भूमिकेला समर्थन मिळाल्याने विरोधकांच्या भूमिकेत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या संघर्षाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असून होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत हा मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणारा देश असल्याने इंधन दरवाढ, महागाई आणि पुरवठा साखळीवर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत.
भारत सध्या ‘वेट अँड वॉच’ धोरण स्वीकारत असल्याचे दिसत आहे. कोणत्याही एका बाजूला उघडपणे समर्थन न देता, सर्व पक्षांशी संवाद राखत राष्ट्रीय हितसंबंध जपण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
Congress MPs Back Centre’s Stand on US–Israel–Iran Conflict, Call Silence a Strategy
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास