Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची ६ तास कसून चौकशी, पूजा-विधी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांवर प्रश्नांची सरबत्ती

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Rupali Chakankar भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक गडद होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची तब्बल सहा तास कसून चौकशी केली.Rupali Chakankar

एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः जवळपास दोन तास चाकणकर यांना प्रश्नांच्या फेऱ्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सकाळपासून सुरू झालेली चौकशी सायंकाळपर्यंत सुरू होती. त्यामुळे या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाल्याची चर्चा राज्यभर रंगली आहे.Rupali Chakankar

अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांना एसआयटी नोटीस बजावणार असल्याची चर्चा सुरू होती. सुरुवातीला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे सांगणाऱ्या चाकणकर अखेर नाशिकमध्ये चौकशीसाठी हजर झाल्या.Rupali Chakankar



सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान एसआयटीने पूजा-विधी, आर्थिक व्यवहार, संस्थात्मक संबंध आणि राजकीय संपर्क यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. “अशोक खरातसोबत संबंध नेमके कधीपासून होते?”, “त्याच्यासोबत कोणते पूजा-विधी करण्यात आले?”, “त्या मागे आर्थिक व्यवहार होते का?”, “खरातच्या मंदिरात येणाऱ्या राजकीय नेत्यांना कोण आणत होते?” अशा अनेक प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.

तसेच खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ नेमके कोणत्या कार्यक्रमातील आहेत आणि त्यावेळी त्यांचे संबंध कशा स्वरूपाचे होते, याबाबतही एसआयटीने माहिती घेतल्याचे सांगितले जात आहे.

चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, “तपास यंत्रणेला आवश्यक असलेली सर्व माहिती मी दिली आहे. एसआयटीच्या प्रत्येक प्रश्नाला मी समर्पक उत्तरे दिली असून माझी बाजू सविस्तर मांडली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य बाहेर येईल.”यापूर्वी

एसआयटीने चाकणकर यांच्या बहिणीचीही एका पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी चौकशी केली होती. त्यामुळे आता या तपासाचा फोकस आर्थिक धागेदोऱ्यांवरही केंद्रित झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, अशोक खरातसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. खरातला त्या “गुरू” मानत असल्याचा दावा करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

वाढत्या राजकीय दबावानंतर चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

आता एसआयटी चौकशीतून कोणती नवी माहिती समोर येते आणि या प्रकरणात आणखी कोणत्या राजकीय व्यक्तींची नावे पुढे येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Rupali Chakankar grilled for 6 hours in Ashok Kharat case; SIT probes rituals, money trail and political links

महत्वाच्या बातम्या