पुणे विधान परिषदेसाठी भाजप नेते संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेल्या विक्रम काकडे यांच्या नावावर तब्बल पाच तास चाललेल्या बैठकीनंतर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यासाठी खासदार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ताकद लावली होती. Vikram Kakade

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात रविवारी रात्री साडेआठ वाजता सुरू झालेली बैठक पहाटे दीड वाजेपर्यंत चालली. या बैठकीला पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह माजी खासदार संजय काकडे हे देखील उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम ठेवण्यासाठी पक्षातील अनेक नेते आग्रही होते. त्याचवेळी भाजपमधील काही इच्छुक नेत्यांनीही या जागेसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणे जवळपास निश्चित झाले. मात्र उमेदवार कोण असणार यावर उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. अखेर विक्रम काकडे यांच्या नावाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर बैठकीत त्यांच्या उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.



विक्रम काकडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार सुनील टिंगरे यांनाही उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. महायुतीच्या अंतर्गत चर्चांमध्ये सुनील टिंगरे हे एकमेव अधिकृत उमेदवार असतील, अशीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र अंतिम क्षणी सुनेत्रा पवार यांनी विक्रम काकडे यांच्या नावाला पसंती दिल्याने सर्व राजकीय अंदाज फोल ठरले.

दुसरीकडे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात थेट सामना होण्याची चिन्हे आहेत. आगामी काही दिवसांत श्रीकांत पाटील उमेदवारी कायम ठेवणार की माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने बहुतांश जागांवरील वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असला, तरी अनेक ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरीचे संकट दोन्ही आघाड्यांसमोर उभे आहे.

NCP fields BJP leader Sanjay Kakade’s son Vikram Kakade for Pune Legislative Council seat

महत्वाच्या बातम्या