अजितदादा नसल्याची पाेकळी प्रत्येक क्षणी जाणवते, सुनेत्रा पवार यांच्या भावना

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज अजितदादा आपल्यात नाहीत, ही पोकळी प्रत्येक क्षणी जाणवते. मात्र त्यांनी जपलेला माणुसकीचा वारसा, विकासाचे राजकारण आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी पुढे नेण्याचा निर्धार करूया,” असे आवाहन  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीतील पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणारा हा पहिलाच वर्धापन दिन असून, खासदार पार्थ पवार, युवक प्रदेशाध्यक्ष धीरज शर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दिल्लीतील कार्यक्रमानंतर मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मुख्य वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे.

याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत दादांच्या स्मृतींना अभिवादन केले. “आज अजितदादा आपल्यात नाहीत, ही पोकळी प्रत्येक क्षणी जाणवते. मात्र त्यांनी जपलेला माणुसकीचा वारसा, विकासाचे राजकारण आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी पुढे नेण्याचा निर्धार करूया,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत अधिक सक्षम आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.

सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पाेस्टमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा! शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या यशस्वी प्रवासाची २७ वर्षे पूर्ण करत आहे. या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने पक्षाला दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे.

पण यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज आदरणीय अजित दादा आपल्यात नाहीत… सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तर कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी वाटेवर चालून अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूया.”

“Ajit Dada’s Absence Is Felt Every Moment,” Says Sunetra Pawar

महत्वाच्या बातम्या