Alandi Palkhi : आळंदीतील पूरस्थितीमुळे पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीत होणार

विशेष प्रतिनिधी

आळंदी: Alandi Palkhi  मुसळधार पावसामुळे आळंदीत निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बुधवार, ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून होणारा पालखी प्रस्थान सोहळा यंदा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पडणार असून, सर्वसामान्य वारकऱ्यांना आळंदीत येऊ नये, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.Alandi Palkhi

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुराच्या प्रचंड प्रवाहात इंद्रायणी पुलावरील कठडे आणि काही वीज खांब वाहून गेले आहेत. आळंदी नगरपरिषदेचे वॉटरहाऊसही पाण्याखाली गेल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.Alandi Palkhi



पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेली दर्शनबारी, भाविकांसाठी ठेवण्यात आलेले अनेक मोबाईल शौचालये तसेच इतर तात्पुरत्या सुविधा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून, तंबू आणि राहुट्यांच्या जागी मोठ्या प्रमाणावर चिखल साचल्याने वारकऱ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.

या परिस्थितीचा आढावा घेत संस्थान समितीने पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार रथापुढील दिंडी क्रमांक १ ते २७ आणि रथामागील दिंडी क्रमांक १ ते २० मधून प्रत्येक दिंडीतील केवळ १० वारकऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण ५६० वारकरी सोहळ्यात सहभागी होतील.

याशिवाय परंपरेनुसार दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी आणि प्रतिष्ठित अशा सुमारे ५०० जणांना नारळप्रसादासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच मानाचे खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी, पोलीस यांच्यासह एकूण सुमारे १,६६० जणांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे.

संस्थान समितीने सर्व वारकरी, भाविक आणि दिंडीप्रमुखांना संयम बाळगण्याचे आवाहन करत, सध्याच्या पूरस्थितीत आळंदीत येऊ नये, असे स्पष्ट केले आहे. हवामानाचा अंदाज आणि पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन पालखीच्या पुढील मुक्कामांबाबत आणि वारकऱ्यांच्या सहभागाबाबत लवकरच स्वतंत्र सूचना प्रसिद्ध करण्यात येतील, असे संस्थानने सांगितले आहे.

प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांनी सर्वांनी प्रशासन आणि देवस्थानाला सहकार्य करावे, तसेच सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.

Alandi Palkhi Departure Ceremony to Be Held with Limited Attendance Amid Flood Situation

महत्वाच्या बातम्या