निवृत्त पोलीस महासंचालक आणि माजी पुणे पोलीस आयुक्त के. के. कश्यप यांचे निधन

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त कमल कृष्ण (के. के.) कश्यप यांचे सोमवारी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या निधनाने महाराष्ट्र पोलीस दलाने एक शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि दूरदृष्टी असलेले वरिष्ठ अधिकारी गमावले आहेत.

त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी १ वाजता पुण्यातील येरवडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

१२ एप्रिल १९४५ रोजी जन्मलेले के. के. कश्यप हे १९६९ बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी होते. त्यांनी १९९९ ते २००१ या कालावधीत पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली.



के. के. कश्यप हे आपल्या शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखले जात होते. त्यांनी पुणे पोलीस आयुक्त असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर संवादाची सुरुवात “हॅलो” ऐवजी “जयहिंद” या अभिवादनाने करावी, अशी पद्धत सुरू केली होती. नंतर पोलीस महासंचालक झाल्यानंतर त्यांनी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात लागू केला. आजही राज्यातील अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ही परंपरा कायम ठेवताना दिसतात.

पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. वरिष्ठ अधिकारी असूनही ते अनेकदा स्वतः रस्त्यावर उतरून वाहतुकीची पाहणी करत, नागरिकांशी थेट संवाद साधत आणि परिस्थितीचा आढावा घेत असत. पोलीस दलाच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप होऊ नये, याबाबत त्यांची भूमिका नेहमीच ठाम होती.
आपल्या सेवाकाळात के. के. कश्यप यांनी महाराष्ट्र पोलीस दलात शिस्त, पारदर्शकता आणि जनाभिमुख पोलिसिंगची मजबूत परंपरा निर्माण केली.

Former Maharashtra DGP and Ex Pune Police Commissioner K.K. Kashyap Passes Away at 81

महत्वाच्या बातम्या