एकता नगरीत पुराचे पाणी, महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडमध्ये; नदीकाठच्या भागांची पहाटेपासून पाहणी

विशेष प्रतिनिधी

पुणे : खडकवासला धरणातून २७ हजार २६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी बुधवारी पहाटेपासून शहरातील पूरस्थितीचा आढावा घेतला. नदीकाठच्या संवेदनशील भागांना भेट देत त्यांनी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सिंहगड रस्त्यावर एकता नगरीत पुराचे पाणी शिरले आहे.

शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकता नगरी परिसरातील एका सोसायटीमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने रहिवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. घरांमध्ये पाणी शिरल्याने फर्निचर, घरगुती साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, शिवणे परिसरातील भीमनगर भागातही अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची वेळ आली. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला.

स्थानिक प्रशासन, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, सखल भागांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



दरम्यान, महापौरांनी राजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, एकता नगरी आणि निंबजनगर या भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करत प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले.

यावेळी महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे तसेच आवश्यकतेनुसार तातडीने मदत व बचावकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले. नदीपात्र आणि नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले.

Floodwaters Inundate Ektanagar, Mayor Manjusha Nagpure Inspects Riverbank Areas

महत्वाच्या बातम्या