विशेष प्रतिनिधी
मुंबई: शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही केवळ एक पेरलेली बातमी असून यात कोणतेही तथ्य नाही,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत सांगत या चर्चांवर पडदा टाकला आहे. Sharad Pawar
ठाकरे गटातील ६ खासदार आणि आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता शरद पवार यांच्या पक्षातही मोठी फूट पडणार असून हा पक्ष ‘एनडीए’त (NDA) सामील होणार, अशी चर्चा रंगली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वरिष्ठ पातळीवर काही राजकीय भेटीगाठी घेतल्याचे समजते. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांवर महत्त्वाची भूमिका मांडली. ते म्हणाले, “सध्या महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही. आम्ही आमच्यासोबत आता कोणालाही जोडणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.
शरद पवार यांच्या पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चा फेटाळून लावताना ते म्हणाले, “पवार यांचे आमदार किंवा खासदारही भविष्यात आम्ही फोडणार नाही.” यामुळे महायुती सध्या अंतर्गत बदलांच्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात शरद पवार यांचा पक्ष थेट एनडीएत सहभागी होणार किंवा एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा देणार, अशा दोन प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. या सर्व वावड्यांवर शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही एनडीएला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणार नाही,” असे सांगत रोहित पवारांनी या चर्चा केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी सुरू असल्याचा आरोप केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळण्याचे संकेत असून, ठाकरे गटाला एकाकी पाडण्याची ही शरद पवारांची नवी खेळी असल्याची चर्चा आता रंगू लागली होती.
Sharad Pawar Joining NDA? CM Calls It a ‘Planted Story’
महत्वाच्या बातम्या