विशेष प्रतिनिधी
मुंबई : माझ्यावर टीका करा, मला शिव्या द्या, त्याची मला सवय आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. दहा वर्षांनी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे नसतील, पण ही कनेक्टिंग लिंक कायम राहणार आहे. एखाद काेटी लाेक मेल्यावर काही जण जन्माला आले आहेत असा जाेरदार हल्लाबाेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विराेधकांवर केला. Devendra Fadnavis
मिसिंग लिंक आणि कनेक्टिंग लिंक प्रकल्पावरून होत असलेल्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, काही लोक टीव्हीवर येऊन खोटे दावे करत आहेत. महायुती सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवली. कोकण रेल्वेच्या वेळीही अनेकांनी दरड कोसळण्याच्या भीतीमुळे हा प्रकल्प करू नये, असे मत व्यक्त केले होते. मात्र तत्कालीन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी धाडसी निर्णय घेत कोकण रेल्वे उभारली.सुरुवातीची अनेक वर्षे दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. पण प्रत्येक वर्षी त्यातून धडे घेतले गेले, तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आणि समस्या कमी करण्यात यश आले. त्या भीतीपोटी कोकण रेल्वेच उभारली नसती तर आज कोकणची काय अवस्था झाली असती?
मुख्यमंत्री म्हणाले की, मागील आघाडी सरकारच्या काळात मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 14 कारणे देत हा प्रकल्प शक्य नसल्याचे सांगून फाइल बंद केली होती. महायुती सरकारने मात्र अधिकाऱ्यांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांनी हा प्रकल्प शक्य असल्याचे सांगितल्यानंतर सरकारने निर्णय घेतला आणि तो पूर्ण करून दाखवला.
“गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले असा शेर सुनावत मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही निर्णय घेतला, अधिकाऱ्यांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आणि तो करून दाखवला. ही केवळ कनेक्टिंग लिंक नाही, तर अभियांत्रिकीचा चमत्कार आहे.”या प्रकल्पात जगातील सर्वात रुंद बोगदा, भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल आणि 170 किलोमीटर प्रतितास वेगाच्या वाऱ्यांनाही तोंड देणारी अभियांत्रिकी रचना उभारण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्या अभियंते, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचेही विशेष कौतुक आहे.
मिसिंग लिंकवरील अलीकडील घटनेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, दरड वरून कोसळून पाण्याच्या कमानीवर पडली आणि त्यामुळे कमानीचा काही भाग तुटला. मात्र केबल-स्टेड पुलाला कुठेही तडे गेले नाहीत किंवा बोगद्यालाही कोणतेही नुकसान झाले नाही. उलट, बोगद्यातील आपत्कालीन यंत्रणा कार्यरत असल्याने इमर्जन्सी बटण दाबल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत क्रेन घटनास्थळी पोहोचली. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोकांनी असा प्रचार केला की हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प वाहून गेला. प्रत्यक्षात अवघ्या 18 तासांत वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटांना पूर्णपणे रोखता येत नसले, तरी त्यांचे परिणाम कमी करण्यासाठी सरकार सर्वंकष नियोजन करत असल्याचे सांगितले. पूर नियंत्रण, धोकादायक इमारती, झाडांचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाद्वारे मुंबईकरांना दरवर्षीच्या पावसाळी संकटातून मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Abuse Me, But Don’t Defame Maharashtra, Devendra Fadnavis Hits Out at Opposition
महत्वाच्या बातम्या