विशेष प्रतिनिधी
पुणे : मोशी कचरा डेपो येथे पाच जून रोजी चिमणी पडण्याची घटना घडली होती. महापालिका आयुक्त, प्रकल्प अधिकारी यांनी तेंव्हाच या घटनेचे गांभीर्य ओळखून उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र, तसे झाले नाही. महापालिका आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हे नऊ बळी गेले आहेत. त्यांना निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
अंधारे यांनी रविवारी (१३ जुलै) जखमी कामगारांच्या आणि मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरप्रमुख चेतन पवार या वेळी उपस्थित होते.
अंधारे म्हणाल्या, मोशी कचरा डेपो येथील दुर्घटना ही मानवनिर्मित आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांच्या हलगर्जीपणामुळे हे बळी गेले आहेत.
पाच जून रोजी या ठिकाणी प्रकल्पाची चिमणी पडली होती. हा अपघात का झाला , याची साधी चौकशीही महापालिका अधिकाऱ्यांनी केली नाही. डेपोच्या शेजारी एक खदान आहे. त्यात ब्लास्ट केले जातात. त्याचा या कचऱ्याच्या डोंगरावर काही परिणाम होतो का, हेही पाहिले गेले नाही. या उलट त्याठिकाणी अनधिकृतपणे इमारत उभी केली. तळमजला बांधण्याची परवानगी असताना दोन मजली इमारत बांधली. या इमारतीला सुरक्षा भिंतही बांधली नव्हती.
दुर्घटनेतील सर्व कामगारांना न्याय मिळेपर्यंत मी लढा सुरू ठेवणार आहे. यातील दोषींना न्यायालयात खेचणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त दुर्घटनेबाबत काही बोलत नाहीत, यात दोष कोणाचा, अनधिकृत बांधकाम होते का नाही, याबाबत अधिकृत बोलत नाही. ते कोणाला वाचवत आहेत ? कचरा डेपोतील गैरप्रकार कोणाच्या सांगण्यावरून लपवत आहेत, त्यांच्या डोक्यावर कोणाचा वरदस्त आहे, हे पाहायला हवे. या घटनेबाबत पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी देखील मौन बाळगून आहेत, अशी टीका अंधारे यांनी केली.
काही लोकांचे हिंदुत्व सिजनेबल असते. सध्या कोणतीही निवडणूक नसल्याने हे लोक घटनास्थळी हिंदू – मुस्लिम, जात – धर्म करायला आले नाहीत, अशी टीका अंधारे यांनी आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता केली. केवळ जात, धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांना या बळींचे काहीही वाटत नाही. इथे जात धर्म करायचे असते तर फडणवीसांची बारकी गँग लगेच हजर झाली असती, असेही त्यांनी सांगितले.
सध्या या घटना पाहता अजित पवारांची उणीव जाणवत आहे. आपण खूप संवेदनशील नेता गमावला आहे. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांची आठवण काढली.