विशेष प्रतिनिधी
पुणे : पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा कायनात धार यांच्यासोबत २९ जुलै रोजी पुण्यात साखरपुडा होणार आहे.
नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यानंतर आता पवार कुटुंबात आणखी एका शुभकार्याची तयारी सुरू झाली आहे.
कायनात धार यांचे पवार कुटुंबाशी कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही महिन्यांत त्या पार्थ पवार यांच्यासोबत विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते. त्यावेळी दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि त्यांच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आले होते.
रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यातही कायनात धार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत उपस्थिती लावली होती. त्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर त्यांच्या नावाची मोठी चर्चा रंगली होती. त्यानंतर लवकरच त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा होईल, अशी चर्चा सुरू होती.
२९ जुलै रोजी पुण्यात होणारा साखरपुडा सोहळा कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि निवडक राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडण्याची शक्यता आहे. विवाहाची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय घराण्यांपैकी एक असलेल्या पवार कुटुंबातील हा आणखी एक महत्त्वाचा कौटुंबिक सोहळा ठरणार असून, त्याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.