विशेष प्रतिनिधी
मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा दावा केल्यानंतर त्यावर आता पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्या पक्षातील एकही खासदार अस्वस्थ नाही. आम्ही सर्वच्या सर्व खासदार शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असे स्पष्ट करत त्यांनी चव्हाणांचा दावा फेटाळून लावला. Bajrang Sonawane
सोनवणे म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे, हे त्यांनाच ठाऊक. आमच्या पक्षातील एकही खासदार अस्वस्थ नाही. आम्ही सर्वजण लोकांची कामे करत आहोत आणि एकदिलाने पक्षासोबत आहोत. आमच्यात कुठलाही बेबनाव किंवा नाराजी नाही.”
ते पुढे म्हणाले, “मी सर्व खासदारांशी सातत्याने संपर्कात असतो. त्यामुळे पक्षातील परिस्थिती मला चांगली माहिती आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना आमच्या पक्षाबद्दल काय वाटते, यावर भाष्य करण्याची गरज मला वाटत नाही. त्यांनी हा दावा कोणाच्या आधारे केला, हे त्यांनीच स्पष्ट करावे.”
सोनवणे यांनी चव्हाणांवर टीका करत म्हटले, “आमच्या खासदारांपैकी किमान सहा जणांचे मोबाईल क्रमांक तरी त्यांच्याकडे आहेत का? आमची त्यांच्याशी ओळख तरी आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वावर 100 टक्के विश्वास ठेवतात आणि त्यांची साथ कधीही सोडणार नाहीत. जे असे दावे करत आहेत, त्यांनी आधी आपले घर सांभाळावे.”
याआधी पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा दावा केला होता. “ही चिंताजनक बाब आहे. त्या खासदारांवर मोदी-शाह सरकारकडून दबाव आणला जात आहे. विरोधी पक्ष अस्तित्वातच राहू नयेत, अशी त्यांची भूमिका दिसते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जे झाले, तेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप चव्हाण यांनी केला होता.
चव्हाण यांच्या या दाव्यानंतर बजरंग सोनवणे यांनी पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचा दावा करत सर्व खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वामागे एकजुटीने उभे असल्याचे ठामपणे सांगितले आहे.