रमेश म्हात्रे डॉक्टर मारहाण प्रकरण, आरोपीला समक्ष हजर केल्याशिवाय सुनावणीस कल्याण न्यायालयाचा नकार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील प्रमुख आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे याला बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी अटक केली. मात्र अटकेनंतर त्यानं छातीत दुखत असल्याचं सांगितलं. एकीकडं कल्याण-डोंबिवलीतील रूग्णालयांमध्ये डॉक्टरांचं आंदोलन सुरू असल्यानं रमेश म्हात्रे याला उपचारासाठी ठाण्यातील सिव्हील रूग्णालयाध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरीकडं आरोपीला समक्ष हजर केल्याशिवाय सुनावणी घेतली जाणार नसल्याचं सांगून न्यायालयानं आरोपी रमेश म्हात्रे याच्या वकिलांची मागणी फेटाळून लावली.



अटक केल्यापासून 24 तासांच्या आत आरोपीला न्यायालयासमोर हजर करणं बंधनकारक आहे. त्यानुसार गुरूवारी दुपारी रमेश म्हात्रे याला डिस्चार्ज देऊन कल्याण न्यायालयात हजर करण्याचं निश्चित झालं होतं. मात्र ऐनवेळी रूग्णालयानं डिस्चार्ज रद्द केला. कल्याण न्यायालयात पोलिसांनी आणि आरोपीचे वकील अॅड. ए. आय. पत्की यांनी रमेश म्हात्रे हा किडनीच्या आजारावर उपचार घेत असल्यानं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यासह पोलीस कोठडी देण्याची, तसेच इतर आरोपींसह उद्या शुक्रवारी हजर करू, अशी विनंती केली. मात्र न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी आरोपीला प्रत्यक्ष हजर केल्याशिवाय सुनावणी घेण्यास आणि कोणतेही आदेश देण्यास स्पष्ट नकार दिला. या संदर्भात अॅड. पत्की यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली.

या प्रकरणात ठाणे सिव्हील रूग्णालयाकडून रमेश म्हात्रे याच्या आरोग्याबाबत कोणतंही ठोस वैद्यकीय प्रमाणपत्र (मेडिकल सर्टिफिकेट) देण्यात आलं नाही. जोपर्यंत मेडिकल रिपोर्ट समोर येत नाही, तोपर्यंत पुढील कायदेशीर पावलं उचलता येत नसल्यानं पोलिसांची अडचण झाली आहे. एकंदरीत कायदा आणि न्यायालयाच्या कचाट्यातून रमेश म्हात्रे याला वाचवण्यासाठीच वैद्यकीय कारण पुढं करून वेळकाढूपणा केला जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Kalyan court refuses hearing in Ramesh Mhatre doctor assault case until accused appears in person

महत्वाच्या बातम्या