शिंदे-पवार भेटीवरून महाविकास आघाडीत मतभेद? राऊतांची नाराजी, राष्ट्रवादीकडून खुलासा

विशेष प्रतिनिधी

मुंबई: विधानभवनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीवरून महाविकास आघाडीत नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर उघड नाराजी व्यक्त केली असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असा खुलासा केला आहे. Sharad Pawar

संजय राऊत म्हणाले, “शरद पवार हे मोठे नेते आहेत. पण अख्खे विधानभवन रिकामे पडले होते का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. आम्ही गद्दारांच्या ठिकाणी जाऊन पक्षाच्या बैठका घेणारे नाही. हे आमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे मत आहे. अशा कृतीमुळे राष्ट्रवादीची विश्वासार्हता कमी होते.”

राऊतांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाच्या किंवा विरोधाच्या नजरेतून पाहू नये. महाविकास आघाडी आजही एकत्र आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीचा विचार करून दुसऱ्या मजल्यावरील दालनाची निवड करण्यात आली. हा केवळ योगायोग असून त्यातून कोणताही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न नाही. उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी याबाबत गैरसमज करून घेऊ नये.”



राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही राऊतांच्या भूमिकेशी असहमती दर्शवत म्हटले की, “आपल्याच आमदारांबरोबर चर्चा करण्यासाठी पायऱ्यांजवळील दालन निवडण्यात आले. शरद पवार यांच्या प्रकृतीचा विचार करून हा निर्णय झाला. एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीसाठी आले होते. पवार दालनात आल्याचे समजताच त्यांनी स्वागत केले आणि ते निघून गेले. आमचे वैचारिक मतभेद असले तरी ते आमचे शत्रू नाहीत.”

दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनीही या भेटीचे समर्थन करत म्हटले, “शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते दालनात आल्यावर एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. त्याचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही.”

मात्र, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानामुळे चर्चेला आणखी उधाण आले आहे. “येत्या काही दिवसांत चांगले निर्णय होताना दिसतील. एनडीएची ताकद वाढताना दिसेल,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे शिंदे-पवार भेटीमागे केवळ शिष्टाचार होता की त्याला राजकीय अर्थ आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळे महाविकास आघाडीतील समन्वय, परस्पर विश्वास आणि आगामी राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, विविध पक्षांकडून त्यावर परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत.

Sanjay Raut Slams Sharad Pawar’s Meeting at Eknath Shinde’s Office, Sparks MVA Rift Buzz

महत्वाच्या बातम्या