आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर अधिक कठोर कलमांखाली कारवाई , प्रकाश आबिटकर यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांची गंभीर दखल सरकारने घेतली असून त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विधेयक आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कायद्यानुसार डॉक्टरांवर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर अधिक कठोर कलमांखाली कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. Prakash Abitkar

केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवरील मारहाणीच्या घटनेनंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉक्टरांना मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी तक्रारींसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनी संप पुकारल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे.

प्रकाश आबिटकर म्हणाले की, एखाद्या डॉक्टरची किंवा अधिकाऱ्याची चूक झाली असेल तर त्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करून न्याय मागण्याची लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊन मारहाण करणे योग्य नाही. अशा घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. सरकारी रुग्णालयांमध्ये काही डॉक्टर किंवा कर्मचारी रुग्णांशी असंवेदनशीलपणे वागतात, अशा तक्रारींबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. अशा प्रकरणांमध्ये नागरिकांनी अधिकृत तक्रार केल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात डॉक्टरांची कमतरता असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना आबिटकर म्हणाले की, आवश्यकतेनुसार आरोग्य सेवेत मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच १ जुलै रोजी १,४०० डॉक्टरांच्या भरतीची घोषणा करण्यात आली असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी डॉक्टरांची संख्या कमी असेल, ती लवकरच पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, या घटनेची सविस्तर माहिती अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती. मात्र, डॉक्टर किंवा परिचारिकांना मारहाण झाल्याचे समोर आले असेल, तर ते शंभर टक्के चुकीचे आहे. संबंधितांना काही तक्रार असेल, तर त्यांनी संबंधित विभाग किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागायला हवी होती.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत होणे ही गंभीर बाब असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलेल, असेही त्यांनी सांगितले.

योगेश कदम म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही स्थानिक पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अशा घटना घडत होत्या. नव्या कायद्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांनीही रुग्णांशी संवेदनशीलतेने वागावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आबिटकर म्हणाले की, “रुग्णांना मदत करण्यासाठी आपण आहोत, ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे. सेवा देताना सहानुभूतीची भूमिका घेतली, तर नागरिकही त्याचा सकारात्मक प्रतिसाद देतील.”

Stricter Charges Against Those Attacking Healthcare Workers, Says Prakash Abitkar

महत्वाच्या बातम्या