विशेष प्रतिनिधी
मुंबई: विधानभवनातील आपल्या अधिकृत दालनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वागत केल्यानंतर झालेल्या राजकीय वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला. “कोणाच्या पोटात दुखत असेल किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल, तर त्यांनी ‘आपला दवाखाना’मध्ये जाऊन उपचार घ्यावेत,” असा टोला शिंदेंनी लगावला. Eknath Shinde
शरद पवार यांनी विधानभवनात शिंदे यांच्या अधिकृत दालनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावर आक्षेप घेत, “ज्या गद्दाराने आमचे सरकार पाडले, त्यांच्याच दालनात बैठक घेणे मोठ्या नेत्यांच्या विश्वासार्हतेला धक्का देणारे आहे,” अशी टीका केली होती.
याला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, “शरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते आहेत. ते आमच्या दालनात आले, त्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी मी स्वतः गेलो. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे आणि ती आम्ही जपत आहोत. मात्र, यामुळे जर कोणाच्या पोटात दुखत असेल किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल, तर मुंबई आणि ठाण्यात सुरू असलेल्या ‘आपला दवाखाना’मध्ये जाऊन त्यांनी उपचार घ्यावेत.”
यावेळी शिंदेंनी राऊतांची टीका फेटाळून लावत, “अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे निव्वळ क्षुद्रपणा आहे. अशा लोकांकडे आम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो,” असेही स्पष्ट केले.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देत, “राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो. उद्या उद्धव ठाकरे आमच्याकडे आले, तरी आम्ही त्यांचे स्वागत करू,” असे विधान केले. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनाही सूचक राजकीय ऑफर देत, “राजकारणात कधीही काहीही घडू शकते,” असे म्हटले.
Eknath Shinde Hits Back at Sanjay Raut: ‘Those With Mental Health Issues Should Seek Treatment’
महत्वाच्या बातम्या