‘फडणवीसांना बदनाम करण्यासाठी पेड वर्कर सक्रिय’; राज ठाकरेंच्या टीकेला बावनकुळे यांचे जोरदार प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी

मुंबई: एका छोट्याशा घटनेचे भांडवल करून काही पेड वर्कर आणि विरोधक देवेंद्र फडणवीस यांची ‘डिझास्टर मॅन’ म्हणून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भविष्यात फडणवीस यांचे नाव ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. Bawankule

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मिमिक्री आणि टीकेचा समाचार घेत बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या विकासाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विधानसभेत मांडलेला दीर्घकालीन आराखडा ऐकून विरोधकांनी टीका करण्याऐवजी त्यांचे अभिनंदन करायला हवे होते. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या दृष्टीने मांडलेल्या या व्हिजनचे स्वागत करायला हवे होते. मात्र, त्यांनी त्याऐवजी राजकीय टीका करण्याचा मार्ग स्वीकारला, याचे दुःख वाटते,” असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 जुलैपासून राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.

या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष शिबिरे भरवून महसूल, ग्रामविकास, कृषी आणि इतर विविध विभागांच्या तब्बल 55 शासकीय सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उपक्रमाचा लाभ किमान 10 लाख कुटुंबांना मिळावा, असा सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबिरांमध्ये गावठाणातील घरांना स्वामित्व कार्ड वाटप, तसेच पात्र महिलांना ‘शेतकरी’ दर्जाचे प्रमाणपत्र देण्याचाही कार्यक्रम होणार आहे. 22 जुलै रोजी शिबिर घेणे शक्य न झाल्यास 25 किंवा 26 जुलै रोजी ते आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार, एकनाथ शिंदे भेटीवरही प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, विरोधी पक्षात असतानाही आम्ही अनेकदा सरकारमधील नेत्यांना भेटत होतो. शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्र्यांशी किंवा उपमुख्यमंत्र्यांशी सन्मानाने चर्चा करतात, ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची परंपरा आहे.
“प्रत्येक भेटीत राजकारण शोधण्याची गरज नाही. लोकशाहीत संवाद कायम राहणे हीच महाराष्ट्राची परंपरा आहे,” असे सांगत त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर अप्रत्यक्ष पलटवार केला.

‘सुनेत्रा पवार रोज मुख्यमंत्र्यांना भेटतात’

सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटींवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवरही बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. “सुनेत्रा पवार या विविध कामांच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना नियमित भेटत असतात. या भेटींचा राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होण्याशी कोणताही संबंध नाही. अशा चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी सुरू असलेल्या राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

“Paid Workers Trying to Tarnish Fadnavis’ Image”: Bawankule Hits Back at Raj Thackeray’s Criticism

महत्वाच्या बातम्या