तुम्ही जामिनावर, भ्रष्टाचारावर बाेलण्यापूर्वी नैतिकतेचा विचार करा, भाजपचा संजय राऊतांवर पलटवार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : तुम्ही अद्याप जामिनावर बाहेर आहात, निर्दोष सुटका झालेली नाही. त्यामुळे भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी नैतिकतेचा विचार करा, असा पलटवार भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. Sanjay Raut

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर नवनाथ बन म्हणाले, दोषी कोणताही असो, चौकशी करून कारवाई केली जाईल; मात्र संजय राऊतांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका त्यांनी केली.

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला आहे. नियमानुसार, ३ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या खरेदीसाठी ‘ई-निविदा’ प्रक्रिया राबवणे बंधनकारक असते. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या नियमाला पूर्णपणे केराची टोपली दाखवत, सोलापूरच्या ‘जगदंबा रेडीमेड ड्रेसेस सहकारी संस्थेला’ कोट्यवधी रुपयांचे काम परस्पर देऊन टाकले, असा आरोप राऊत यांनी केला आहे. यावर आता भाजपने पलटवार करत प्रत्युत्तर दिले.



विकासनिधीच्या मुद्द्यावरूनही बन यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या काळात भाजपच्या 105 आमदारांना एक रुपयाचाही निधी देण्यात आला नव्हता. मात्र त्यानंतरही भाजपचा एकही आमदार पक्ष सोडून गेला नाही. “माणसं पैशामुळे फुटत नाहीत, प्रेम आणि आपुलकीमुळे जोडली जातात,” असे म्हणत बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे खासदार आणि आमदारांना भेटत नाहीत, तर संजय राऊत सातत्याने स्वतःच्या पक्षातील लोकप्रतिनिधींवरही टीका करतात. त्यामुळेच अनेक लोक पक्ष सोडून गेले असून भविष्यातही महाविकास आघाडीतील अनेक नेते त्यांची साथ सोडतील, असा दावा बन यांनी केला. ते म्हणाले, “महाविकास आघाडी ही महाविकास नसून महाविनाश आघाडी आहे. या आघाडीकडे कोणताही समान अजेंडा किंवा विचार नाही. एकमेकांवर टीका करणे आणि शिवीगाळ करणे एवढेच काम त्यांच्याकडे उरले आहे.”

नांदेडमध्ये पूल कोसळल्याचा आरोप फेटाळताना बन म्हणाले की, पूल कोसळलेला नसून केवळ एक छोटी संरक्षक भिंत कोसळली आहे. तिची दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात आली असून या कामात कोणताही गैरव्यवहार झाला असल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करताना नवनाथ बन म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील काँग्रेसची मोठी पडझड झाली आहे. राहुल गांधींनी देशातील काँग्रेसचे नुकसान केले आहे. ते खऱ्या अर्थाने काॅंग्रेससाठी “डिझास्टर मॅन” आहेत.

Think about morality before speaking on bail and corruption: BJP hits back at Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या