विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वसई-विरारमधील पूरस्थितीच्या मुद्द्यावरून विधानसभेत शुक्रवारी मोठा राजकीय गदारोळ झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्यातील शाब्दिक चकमक चांगलीच रंगली. या वादात शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी उडी घेत भातखळकरांवर थेट निशाणा साधत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. Aaditya Thackeray targets Atul Bhatkhalkar
वसई-विरार परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित करत भास्कर जाधव यांनी सरकारला धारेवर धरले. पूरग्रस्तांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी सभागृहात कॅबिनेट मंत्री उपस्थित नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत, पण उत्तर देण्यासाठी मंत्री कुठे आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधकांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेवर आक्षेप घेत हस्तक्षेप केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली.
भातखळकरांच्या हस्तक्षेपानंतर भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले. “तुमचं ज्ञान, तुमची कुवत आणि तुमची झेप लोकांना माहिती आहे. लय घमेंडखोर आहात. नुसते कोपऱ्यात बसून प्रत्येक वेळी अहंकार दाखवता. मध्ये बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही राम मंदिरात चोऱ्या करणारे आहात. मला निष्ठा शिकवण्यापूर्वी स्वतःचा इतिहास पाहा,” अशा शब्दांत त्यांनी भातखळकरांवर टीका केली.
वाद अधिकच चिघळत असताना आदित्य ठाकरे यांनीही हस्तक्षेप करत अतुल भातखळकरांवर थेट हल्लाबोल केला. “तुम्ही आम्हाला काय करायचे ते सांगू नका. राम मंदिर लुटणाऱ्यांनी तर आम्हाला अजिबात सांगू नये. तुम्ही आधी खाली बसा. सभागृहात काय चाललंय, नीट बोला. आता तुमचं वय झालंय, त्यामुळे वयाचं भान ठेवून बोला,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
या संपूर्ण गदारोळानंतर अतुल भातखळकर यांनी विरोधकांच्या वक्तव्यांवर तीव्र आक्षेप घेत सरकारची बाजू मांडली. “सरकार प्रत्येक विषयाला संवेदनशीलपणे उत्तर देत आहे. मात्र, विरोधकांकडून सरकारविरोधात असंसदीय आणि बेताल भाषा वापरली जात असेल, तर ती आम्ही सहन करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पूरग्रस्तांच्या प्रश्नावरून सुरू झालेली चर्चा अखेर तीव्र राजकीय संघर्षात परिवर्तित झाली. दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी आणि शाब्दिक बाचाबाची झाल्याने विधानसभेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले.