Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; विशेष मोका न्यायालयाची मुंबई पोलिसांवर ताशेरे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Baba Siddique  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात फरार आरोपी आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आवश्यक कायदेशीर पावले उचलावीत, असे निर्देश विशेष मोका न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रियतेवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.Baba Siddique

विशेष मोका न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यनारायण नवंदर यांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, आरोपीला ताब्यात घेणे, त्याची चौकशी करणे आणि न्यायालयात हजर करणे ही तपास यंत्रणेची कायदेशीर जबाबदारी आहे. अशा गंभीर खटल्यात न्यायालयाला तपास यंत्रणेला तिची कर्तव्ये आठवण करून द्यावी लागणे ही दुर्दैवी बाब असल्याचे न्यायालयाने नमूद केले.Baba Siddique



ही सुनावणी बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शेहझीन सिद्दीकी यांनी दाखल केलेल्या अर्जावर झाली. त्यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अर्जात, बाह्य दबावामुळे मुंबई पोलीस अनमोल बिश्नोईला ताब्यात घेण्यास आणि चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सांगितले की, राष्ट्रीय तपास संस्थाच्या प्रकरणात केंद्र सरकारच्या आदेशामुळे अनमोल बिश्नोईला तिहार कारागृहातून बाहेर आणण्यास मर्यादा आहेत. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला न्यायालयासमोर हजर करणे, न्यायालयाची परवानगी घेऊन तिहार कारागृहातच चौकशी करणे आणि आवश्यक असल्यास या प्रकरणात औपचारिक अटक दाखवणे असे कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.

न्यायालयाने असेही नमूद केले की, अनमोल बिश्नोईला या प्रकरणात अटक करून इतर आरोपींसोबत संयुक्त खटला चालविणे आवश्यक आहे. अन्यथा खटल्याच्या सुनावणीत विसंगती निर्माण होऊ शकते आणि न्यायप्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

उल्लेखनीय म्हणजे, 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे येथे मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी तपास सुरू असून अनमोल बिश्नोई हा या प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी मानला जात आहे.

Baba Siddique murder case: Special MCOCA court pulls up Mumbai Police

महत्वाच्या बातम्या