छेडछाडीला विरोध केल्याने कुटुंबाचा १५ किमी थरारक पाठलाग!

विशेष प्रतिनिधी

नाशिक :- पाऊस झाल्यानंतर नाशिकमधील nashik पर्यटन स्थळांवर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर टवाळखोरांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं ?

नाशिक शहरात आता पावसानंतर हळूहळू हिरवाई पसरण्यास सुरुवात झाल्याने शहरात राहणाऱ्या पुनम भागवत या रविवारी आपल्या कुटुंबातील ८ सदस्यांसह भावली धरणावर फिरण्यासाठी गेल्या होत्या. फिरून झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा दोन टवाळखोरांनी भागवत यांच्या कुटुंबातील एका महिलेची छेड काढली.



या प्रकारावर संतापलेल्या भागवत आणि त्यांच्या पतीने आक्षेप घेत, “सार्वजनिक ठिकाणी असे वागणे योग्य आहे का?” असा जाब विचारला. यावरून टवाळखोरांनी कुटूंबीयांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली धक्कादायक म्हणजे वाद घालत थेट अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न हुल्लडबाजांनी केला. कुटुंबियांनी प्रतिकार केल्यावर ते तिथून पळून गेले. मात्र ते इथेच थांबले नाही.

१० ते १५ किलोमीटर पाठलाग

काही अंतरावर उभा असलेल्या एका टेम्पो जवळील ८ ते १० जण पुन्हा भागवत कुटुंबाशी हुज्जत घालू लागले. घाबरलेल्या कुटूंबियांनी वाद वाढू नये म्हणून आपल्या टाटा सफारी गाडीतून तिथून निघून गेले. मात्र, चिडलेल्या टवाळखोरांनी एका पांढऱ्या बलेनो कारमधून आणि दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. गुंडांनी जवळपास १५ किलोमीटरपर्यंत गाडीचा थरारक पाठलाग केला.

पाठलाग करत असताना हातात लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन धावत्या गाडीवर ठिकठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात सफारी कारच्या समोरील आणि मागील काचा पूर्णपणे फुटल्या . गाडीत बसलेल्या महिलांना काचा लागून किरकोळ दुखापतही झाली आहे. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत चालकाने प्रसंगावधान राखत गाडी वेगाने पळवून थेट अंबड पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांकडून कारवाई सुरु

दरम्यान, भागवत कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. अंबड पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली आहे. व्हायरल व्हिडिओ आणि गाडीच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत ६ ते ७ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता पर्यटकांकडून केली जात आहे. मात्र पर्यटन स्थळावर घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Family subjected to a thrilling 15-km chase after resisting molestation!

महत्वाच्या बातम्या