विशेष प्रतिनिधी
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासंदर्भात इथेनॉलच्या मुद्द्यावरून खोटी व दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी बिहारमधील युट्युबर मनीष कश्यपसह चार सोशल मीडिया खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nitin Gadkari
भाजपच्या नागपूर शहर सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.भाजप नागपूर शहर सोशल मीडिया सेलचे संयोजक शिशिर त्रिपाठी, सहसंयोजक संपत पांडे आणि आदित्य जुमा यांनी संयुक्तपणे ही तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार ३ जुलै रोजी सकाळी ११ ते ११.३० या दरम्यान ‘मनीष कश्यप बिहार’ या युट्युब चॅनलवरून इथेनॉल विषयावर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला.
या व्हिडिओत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात खोटे, दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक आरोप केले असल्याचा जनतेची दिशाभूल करण्यात आली. याशिवाय ‘देसी बॉईज’, ‘हर्षित राठी’ आणि ‘अंकलेश इनवाती’ या इन्स्टाग्राम खातेधारकांनीही इथेनॉल संदर्भात आक्षेपार्ह व दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ही तथ्यहीन माहिती पसरवून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला. सर्व सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओंचे पुरावे तक्रारीसोबत सादर करण्यात आले. पोलिसांनी चारही जणांविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३५६, ३५२, २९६ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी, बदनामीकारक किंवा सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Case filed against YouTuber, four others for allegedly defaming Nitin Gadkari over ethanol remarks
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा