जळगाव हादरलं ! सासू अन् पतीने अंध माय-लेकाला ढकललं विहिरीत

विशेष प्रतिनिधी

जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे कौटुंबिक कलहातून सासू आणि पतीने आपल्याच अंध पत्नीसह साडेतीन वर्षांच्या मुलाला विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात साडेतीन वर्षाच्या निष्पाप बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे, तर त्याची अंध माता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.Jalgaon

किनगाव येथील एका विहिरीत महिला आणि लहान मुलगा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. दुर्दैवाने साडेतीन वर्षाचा मुलगा मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर महिला गंभीर जखमी होती. विहिरीत पडलेले दोघेही अंध असल्याने सुरुवातीला हा घातपात नसून केवळ एक अपघात असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात होता.



अंध मातेच्या जबाबाने सत्य आले समोर

मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमी माता सरस्वती पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. सरस्वती पाटील आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा या दोघांनाही त्यांची सासू आशाबाई पाटील आणि स्वतः अंध असलेला पती स्वप्नील पाटील यांनीच विहिरीत ढकलल्याचे स्पष्ट केले.

काय होते वादाचे कारण?

आरोपी पती स्वप्नील पाटील आणि त्याची पत्नी सरस्वती दोघेही अंध आहेत. सरस्वती या पुन्हा गरोदर असताना त्यांच्या वैद्यकीय तपासणीत म्हणजेच होणारे बाळ देखील अंध असल्याचे स्पष्ट झाले होते. असे असतानाही सरस्वती यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय कायम ठेवला आणि त्या गर्भपाताला तयार नव्हत्या. याच कारणावरून पती स्वप्नील आणि सासू आशाबाई यांच्यासोबत सरस्वती यांचा गेल्या काही महिन्यांपासून मोठा वाद सुरू होता. याप्रकरणी यावल पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.

Jalgaon Shaken! Mother-in-law and Husband Push Blind Mother and Son into Well

महत्वाच्या बातम्या