पुणेकरांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षाच; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला विलंब

विशेष प्रतिनिधी

पुणे: हिंजवडीत कामानिमित्त जाणाऱ्या लाखो पुणेकरांच्या नशिबी प्रतीक्षा कायम असणार आहे. कारण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा metro  प्रवास पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी 15 जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता हा मुहूर्तही टळला असून जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मेट्रोचा पहिला टप्पा सुरू करण्याचे नियोजन आहे.

हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी ही पुण्यातील तिसरी मेट्रो मार्गिका आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड कंपनीसोबत राबवण्यात येत आहे. 23 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गासाठी आतापर्यंत तब्बल 6 वेळा अंतिम मुदत बदलण्यात आली आहे. सुरुवातीला संपूर्ण मार्ग एकाच टप्प्यात सुरू करण्याचा मानस होता.



मात्र, कामाचा वेग अपेक्षेपेक्षा मंद असल्याने राज्य सरकारने मार्चमध्ये धोरणात बदल करून टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, माण ते बालेवाडी हा पहिला टप्पा सुरू करण्यावर भर देण्यात आला; मात्र त्यालाही आता विलंब होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यात पुणे दौऱ्यावर असताना मेट्रोचा पहिला टप्पा मे महिन्यात तर दुसरा टप्पा जुलैपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. प्रशासनालाही फडणवीसांनी सूचना दिल्या होत्या. मात्र दरवेळी हे मुहूर्त टळले आहेत.

विलंबामुळे खर्चात 20 टक्क्यांची वाढ

याबाबत पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची तपासणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पूर्ण झाली आहे. या मार्गावरील सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी 10 दिवसांचा वेळ लागू शकतो. ही मंजुरी मिळाल्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेट्रोचा पहिला टप्पा सुरू करण्याची योजना आहे. दरम्यान, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील सर्व स्थानकांवरील सेवा सुरू होण्यास पुढील वर्षाचा मार्च महिना उजाडणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास मुदतीपेक्षा एक वर्षांहून अधिक काळ लागल्याने एकूण खर्चात सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा खर्चाचा बोजा पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनी उचलणार आहे.

या मेट्रोमुळे आयटी कर्मचाऱ्यांसह लाखो पुणेकरांचा प्रवास सुकर होणार आहे. मात्र मेट्रोला मुहूर्त लागत नसल्याने तूर्तास तरी पुणेकरांची हिंजवडीच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या स्पष्ट निर्देशांनंतरही आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. आता पुन्हा दिलेल्या वेळेत तरी या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार का? याकडे हिंजवडीतील लाखो आयटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

More waiting for Pune residents; Hinjawadi-Shivajinagar Metro journey delayed

महत्वाच्या बातम्या