विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर :- एका विवाहात केवळ नाव घेतले नाही म्हणून तलाठ्याने चक्क सूत्रसंचालकाच्या डोक्यात माईक घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीस गंभीर दुखापत झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.Jamkhed
मिळालेल्या माहितीनुसार जामखेड येथे “मातोश्री मंगल कार्यालयात ” एका विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.या लग्नकार्यात अशोक रामचंद्र पठाडे हे सूत्रसंचालक म्हणून आलेल्या पाहुण्यांचे माईकवरून नाव पुकारून स्वागत करत होते.लग्न सोहळा सुरू असतानाच तिथे उपस्थित असलेले तलाठी शिवाजी हजारे यांनी अचानक व्यासपीठाजवळ येत वाद घालण्यास सुरुवात केली. “तू माईकवर माझे नाव का घेतले नाही?” असा जाब विचारत तलाठ्याने अशोक पठाडे यांना भर मंडपात सर्वांसमोर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद एवढा वाढला की, तलाठी हजारे यांनी नियंत्रण गमावले आणि पठाडे यांना जोराची चापट मारली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी पठाडे यांच्या हातातील लोखंडी माईक हिसकावून घेत थेट त्यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात लोखंडी माईक डोक्यात लागल्यामुळे पठाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.Jamkhed
रुग्णालयात उपचार सुरू, पोलिसांत गुन्हा दाखल
हा धक्कादायक प्रकार घडताच लग्नकार्यात एकच खळबळ उडाली. उपस्थित पाहुण्यांनी आणि नातेवाईकांनी तात्काळ मध्यस्थी करत वाद सोडवला आणि जखमी अशोक पठाडे यांना उपचारासाठी तात्काळ जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी आरोपी तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका जबाबदार सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीने केवळ नाव पुकारले नाही म्हणून केलेल्या या गुंडगिरीमुळे संपूर्ण तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जामखेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Talathi resorts to thuggery after his name isn’t mentioned at a wedding; smashes microphone on the compere’s head.
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा