राहुल गांधींना महाराष्ट्राबाबत चुकीचे ब्रीफिंग. चंद्रशेखर बावनकुळे यांचा टाेला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काॅंग्रेस नेते राहुल गांधींना महाराष्ट्राबाबत योग्य माहिती दिली जात नाही. त्यांना चुकीचे ब्रीफिंग मिळत आहे,” असा टाेला भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. Chandrashekhar Bawankule

राहुल गांधी यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने या प्रकरणात आजवरची सर्वात गंभीर कारवाई केली आहे. त्यांच्या मते, पेपरफुटीच्या साखळीवर कठोर कारवाई झाल्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही.

राहुल गांधींना महाराष्ट्रातील घडामोडींविषयी चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप करत बावनकुळे म्हणाले, “त्यांना जर योग्य माहिती हवी असेल तर चांगले ब्रीफिंग करणारे लोक पाठवू.”

पावसाच्या अनियमिततेमुळे किंवा बोगस बियाण्यांमुळे ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे, त्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार, अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचा खर्च स्वतः करावा लागणार नाही. जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून शासनच बियाणे उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांविरोधात मोठी मोहीम सुरू असल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले की, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळसह विविध जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, त्यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातून येणाऱ्या संशयित बियाण्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात भेसळयुक्त दुधाविरोधात सुरू असलेल्या कारवाईचे स्वागत करत बावनकुळे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कौतुक केले. भेसळयुक्त दूध विकून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांलगतच्या झाडांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑडिट झाले पाहिजे. जुनी आणि धोकादायक झाडे ओळखून त्यांच्यावर वेळेत उपाययोजना करणे आवश्यक असून विकासकामांदरम्यान झाडांचे संरक्षण करण्यासाठीही विशेष यंत्रणा उभारली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मोहरम मिरवणुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद कॅप्सूल आणि देशविरोधी कारवायांबाबतच्या चौकशीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, पोलीस अत्यंत गंभीरपणे तपास करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली आधुनिक तपास यंत्रणांच्या मदतीने अशा विघातक प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

Rahul Gandhi misinformed about Maharashtra, says Chandrashekhar Bawankule

महत्वाच्या बातम्या