आम्ही सर्वजण एकजुट, विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचेे सुनील तटकरे यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आमच्या पक्षात कोणताही गैरसमज नाही. आम्ही सर्वजण एकजुट आहोत आणि ज्या काही गोष्टी सांगायच्या असतात, त्या आम्ही थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सांगतो,” असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले. शरद पवार गटासोबतच्या विलीनीकरणाच्या चर्चा आता भूतकाळ झाल्या असून त्याला पूर्णविराम मिळाला असल्याचे त्यांनी जाहीर केले. Sunil Tatkare

प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी घेतलेली भेट, सुनेत्रा पवार यांच्या निवडीला पक्षांतर्गत मिळालेली कायदेशीर नोटीस आणि शरद पवार गट महायुतीत (NDA) येणार असल्याच्या चर्चांमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यावर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका मांडली. ते म्हणाले, स्वर्गीय दादा असताना दोन्ही गट एकत्र येण्याबाबत आणि विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती, हे वास्तव आहे. मात्र, दादांच्या निधनानंतर या प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला. नुकत्याच झालेल्या शरद पवार गटाच्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही आता विलीनीकरणाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नव्याने कुठेही चर्चा सुरू नाही .



तटकरे म्हणाले की, त्यांचा आणि शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भेटीचा काडीमात्र संबंध नाही. जयंत पाटील हे ज्येष्ठ आणि स्वयंभू नेते असून ते सांगलीच्या नगरपालिकेच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले होते. तर, प्रफुल पटेल आणि आपण स्वतः रायगड व मतदारसंघातील इतर विकासकामांच्या मंजुरीसाठी आधीच वेळ मागितली असल्याने तिथे गेलो होतो.

सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या नोटीसवर बोलताना तटकरे म्हणाले की, या विषयावर पक्षाच्या कोअर कमिटीत आणि देवगिरी बंगल्यावर सविस्तर चर्चा झाली आहे. लवकरच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत, ज्यामध्ये अर्थविभागासह अनेक महत्त्वाच्या शासकीय विषयांवर चर्चा केली जाईल.
स्वर्गीय अजित दादांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीमधील योगदानाचा आदर करत राज्य सरकारने शासकीय कार्यालयांमध्ये त्यांची जयंती साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याबद्दल तटकरे यांनी मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले. बॅनरवर दादांचा एकच फोटो लावण्याच्या आणि जिओ टॅगिंगच्या पक्षाच्या निर्णयावर आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नसून, सर्वांनी 15 दिवसांपूर्वीच देवगिरीवर एकत्र येऊन हा मसूदा निश्चित केला असल्याचे त्यांनी सांगितले.

We are united, merger talks are over,” Sunil Tatkare clarifies

महत्वाच्या बातम्या