लातूरच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञाच्या मृत्यूने खळबळ !

विशेष प्रतिनिधी

लातूर :- Latur  लातूर शहरातील एम.जे. हॉस्पिटलचे अत्यंत नामांकित हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल ईश्वर राठोड यांनी बुधवारी लातूर शहराजवळ स्वतःच्या चारचाकी कारमध्ये आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यांनी स्वतःलाच भूल देणारे इंजेक्शन टोचवले असल्याचे उघड झाले आहे. याबाबत नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही .

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी डॉ. मेहुल राठोड यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रियांका या नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्यानंतर लगेचच डॉ. मेहुल हे आपली इनोव्हा कार घेऊन घराबाहेर पडले. सायंकाळी 4 वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने आणि त्यांचा कोणताही संपर्क होत नसल्याने डॉ. प्रियांका यांनी त्यांच्या मोबाईलवर कॉल केला.मात्र, डॉ. मेहुल यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांना संशय आला. अखेर डॉ. प्रियांका यांनी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले. तेव्हा डॉ. मेहुल यांचे मोबाईल लोकेशन घरापासून 8 किलोमीटर दूर अंबाजोगाई रोडवरील एमआयटी कॉलेजजवळ असल्याचे दाखवले.

भूल देणाऱ्या औषधाचा ओव्हरडोस; कारमध्ये आढळले इंजेक्शन

लोकेशन मिळताच डॉ. प्रियांका आणि त्यांच्या हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याने तातडीने अंबाजोगाई रोडच्या दिशेने धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर त्यांना डॉ. मेहुल हे कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने जवळील फुलाबाई बनसोडे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक अंदाजानुसार, भूल देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचा ओव्हरडोस घेतल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा.



या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांना डॉ. मेहुल यांच्या इनोव्हा कारमध्ये अत्यंत महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. कारमधील सीटच्या बाजूलाच काही इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या आणि सिरिंज आढळून आल्या आहेत. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असला, तरी पोलीस या प्रकरणात घातपाताच्या कोनातून देखील सखोल चौकशी करत आहेत.

Death of renowned Latur cardiologist causes a stir.

महत्वाच्या बातम्या