विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा निकटवर्तीय असलेल्या सचिन वाझे याने अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात डिस्चार्ज अर्ज म्हणजेच खटल्यातून नाव वगळण्याची केलेली याचिका मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळली आहे. Sachin Waze
न्यायालयाने स्पष्ट केले की, वाझेविरुद्ध खटला चालवण्यासाठी आणि आरोप निश्चित करण्यासाठी रेकॉर्डवर ‘पुरेशापेक्षा जास्त पुरावे’ उपलब्ध आहेत. विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी सचिन वाझेच्या १५७ पानांच्या अर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “वाझे यांनी त्यांच्या अर्जात सोयीनुसार तत्त्वज्ञान, स्वतःचे दृष्टिकोन आणि चुकीचे संदर्भ दिले आहेत. जर यात अजून काही ओळी असत्या, तर या अर्जाने ‘ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया’लाही मागे टाकले असते. या संपूर्ण अर्जात फक्त ‘गुणवत्तेची’ कमतरता आहे.
न्यायालयाने वाझेचा हा अर्ज म्हणजे खटला विनाकारण लांबवण्याचे एक अनावश्यक उदाहरण असल्याचे म्हटले आहे. एनआयएने वाझेच्या अर्जाला १४५ पानांचे उत्तर देऊन कडाडून विरोध केला होता. अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात वाझे मुख्य सूत्रधार होता, असे एनआयएने म्हटले आहे.
या प्रकरणात एनआयएचे आरोपपत्र तब्बल १४,००० पेक्षा जास्त पानांचे असून, त्यात ३०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब आणि विस्तृत इलेक्ट्रॉनिक पुरावे (सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि टॉवर लोकेशन्स) समाविष्ट आहेत.वाझेने यापूर्वीही कार्यक्षेत्र आणि योग्य मंजुरीच्या अभावाचा मुद्दा उपस्थित करून खटला बंद करण्याची मागणी केली होती. ऑक्टोबर २०२५ मध्ये न्यायालयाने ही मागणी फेटाळली होती.याशिवाय, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या (UAPA) कलमांना आव्हान देणाऱ्या वाझेच्या याचिका बॉम्बे हायकोर्ट आणि दिल्ली हायकोर्टानेही यापूर्वीच फेटाळल्या आहेत. हा ‘डिस्चार्ज अर्ज’ फेटाळला गेल्यामुळे आता सचिन वाझेविरुद्ध न्यायालयात अधिकृतपणे आरोप निश्चिती होऊन मुख्य फौजदारी खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Sachin Waze’s Plea to Drop His Name from Antilia Bomb Scare and Mansukh Hiren Murder Cases Rejected
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा