Pune: पुण्यात तब्बल 22 दिवसांत 452 मिमी पावसाची नोंद; 12 वर्षांचा ‘तो’ रेकॉर्ड मोडला!

विशेष प्रतिनिधी

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही सलग तिसऱ्या दिवशी पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. आता पुढील दोन दिवस पुण्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या 22 दिवसांत पुण्यात तब्बल 452 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.  ( Pune Rain )

जवळपास आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरात गारवा चांगलाच वाढला आहे. कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. शहरात तापमानाचा पारा २६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम आहे. शहरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून रेड अलर्ट देण्यात आला आहे.

12 वर्षांचा विक्रम मोडला
पुण्यात फक्त जुलै महिन्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे की, गेल्या एक-दोन वर्षांचे नव्हे तर थेट तब्बल 12 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये मात्र पुणे शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. अवघ्या 22 दिवसांत पुण्यात तब्बल 452 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात जुलै महिन्याचा सरासरी पाऊस अवघा 181.1 मिमी इतका असतो. मात्र, यंदा 1 ते 22 जुलै दरम्यानच तब्बल 452.6 मिमी पाऊस बरसला आहे. ही संख्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे. यापूर्वी 2014 मध्ये जुलै महिन्यात 282.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तो विक्रमही यंदा मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे, जुलै महिना संपायला अजून 8 दिवस बाकी असतानाच हा ऐतिहासिक रेकॉर्ड झाला आहे.

Pune: 452 mm of rainfall recorded in Pune in just 22 days; a 12-year-old record broken!

महत्वाच्या बातम्या