Abu Azmi : अबू आझमी यांनी मागितली औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यावर माफी

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Abu Azmi  राज्यभरातून संताप व्यक्त होत असल्याने समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबाबत केलेल्या एका वक्तव्यावर माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द व संपूर्ण वक्तव्य मागे घेतो, असे ते म्हणाले.Abu Azmi

विधिमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्याच्या शासन काळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता असे वक्तव्य केले होते. आज भाजपा व शिवसेना (शिंदे) आमदारांनी विधानसभेत या वक्तव्यावरून गोंधळ घातला. अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली.

त्यामुळे आझमी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “माझ्या वक्तव्याची मोड-तोड करून ते सादर करण्यात आलं आहे. औरंगजेब रहमतुल्लाह अलेह यांच्याबद्दल मी तेच वक्तव्य केलं जे इतिहासकारांनी व लेखकांनी आपल्यासमोर मांडलं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणत्याही प्रकारचं अपमानजनक वक्तव्य केलं नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द व संपूर्ण वक्तव्य मागे घेतो. माझं वक्तव्य एक राजकीय मुद्दा बनलं आहे. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन तहकूब होणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे जनतेचं नुकसान होतंय.

अबू आझमी म्हणाले, “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी कोणाचाही अपमान केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या सर्व महान पुरुषांचा मी आदर करतो. सर्वांनी त्यांचा आदर करायला हवा, यांना आदर्श मानून वाटचाल करायला हवी. मी औरंगजेबाबद्दल जे वक्तव्य केलं ते इतिहासकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर केलं होतं. परंतु, त्या वक्तव्यामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब व्हायला नको होतं. विधीमंडळात आपल्याला खूप कामं करायची आहेत. जनतेची कामं प्रलंबित आहेत. विधीमंडळाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी मी माझं वक्तव्य मागे घेतो.

Abu Azmi apologized for his statement about Aurangzeb

महत्वाच्या बातम्या