मेक इन इंडियाचे यश, भारत बनला आय फोनचा सगळ्यात मोठा निर्यातदार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ॲपल इंक या जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीने भारतातून विक्रमी आयफोन निर्यात करत डिसेंबर 2025 पर्यंत तब्बल 50 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीचे आयफोन परदेशात पाठवले आहेत. उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (PLI) योजनेमुळे हा मोठा टप्पा गाठणे शक्य झाले आहे. iPhone Export

आर्थिक वर्ष 2022 मध्ये ॲपलने स्मार्टफोन PLI योजनेत सहभाग घेतला होता. आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांतच कंपनीने जवळपास 16 अब्ज डॉलर्सची आयफोन निर्यात केली असून, संपूर्ण PLI कालावधीत एकूण निर्यात 50 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

याच पाच वर्षांच्या कालावधीत ॲपलची आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धी कंपनी सॅमसंग हिने सुमारे 17 अब्ज डॉलर्स किमतीचे मोबाइल फोन निर्यात केले आहेत. यामुळे जागतिक स्मार्टफोन निर्यातीमध्ये ॲपलभारतातून आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत ॲपलच्या जागतिक पुरवठा साखळीचा मजबूत आधार

सध्या भारतात ॲपलशी जोडलेल्या सुमारे 45 कंपन्यांची पुरवठा साखळी कार्यरत आहे. यामध्ये अनेक लघु व मध्यम उद्योगांचा (MSME) समावेश आहे. देशात पाच आयफोन उत्पादन प्रकल्प असून, त्यापैकी तीन टाटा समूहाकडे तर दोन फॉक्सकोन डे आहेत.

आयफोन निर्यातीमुळे FY25 मध्ये स्मार्टफोन हा भारताचा सर्वात मोठा निर्यात घटक ठरला आहे. 2015 मध्ये हा क्रमांक 167 वा होता, हे विशेष उल्लेखनीय आहे. सध्या भारतातून होणाऱ्या एकूण स्मार्टफोन निर्यातींपैकी सुमारे 75 टक्के वाटा आयफोनचा आहे.

स्मार्टफोनसाठीची PLI योजना मार्च 2026 मध्ये संपणार असली, तरी केंद्र सरकार या क्षेत्राला अन्य स्वरूपात मदत देण्याच्या तयारीत आहे. “चीन आणि व्हिएतनामच्या तुलनेत भारतीय उत्पादकांना अजूनही काही अडचणी आहेत. त्यामुळे उत्पादनाला चालना देण्यासाठी उद्योगांच्या सल्ल्याने नवीन प्रोत्साहन योजना तयार केली जाईल,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ॲपलपरिसंस्थेत भारतीय कंपन्यांची मोठी भूमिका

PLI योजनेनंतर ॲपलने मोठ्या प्रमाणावर आपले पुरवठादार भारतात आणले. सध्या चीननंतर iPhone उत्पादन करणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. Tata Electronics, Motherson आणि Foxconn या कंपन्या iPhone साठी एन्क्लोजर तयार करणार आहेत. ATL लिथियम-आयन सेल्सचे उत्पादन करणार असून, Hindalco अॅल्युमिनियम एक्सट्रूजनची जबाबदारी सांभाळणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे भारत आता पहिल्यांदाच चीन आणि व्हिएतनामकडे इलेक्ट्रॉनिक घटकांची निर्यात करू लागला आहे. हे घटक MacBook, AirPods, Apple Watch, Apple Pencil आणि iPhone च्या निर्मितीसाठी वापरले जाणार आहेत.

या घडामोडींमुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यातीच्या जागतिक नकाशावर वेगाने पुढे जात असून, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठे यश मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Make in India Triumph, India Emerges as World’s Largest iPhone Export Hub

महत्वाच्या बातम्या