विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर करत बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे दोन छायाचित्रे शेअर करत, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य याविषयी गौरवोद्गार काढले आहेत.
महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणी यासाठी बाळासाहेब ओळखले जात होते. जनतेशी त्यांचं एक वेगळंच नातं होतं, जे इतर नेत्यांपेक्षा त्यांना वेगळं ठरवत होतं. राजकारणापुरतेच मर्यादित न राहता, बाळासाहेबांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. त्यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर आजही स्पष्टपणे दिसून येतो.
व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजातील वास्तव, विसंगती आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी निर्भयपणे भाष्य केलं, असं मोदींनी म्हटलं आहे. समाजाचं सूक्ष्म निरीक्षण आणि धारदार शैली हे त्यांच्या व्यंगचित्रांचं वैशिष्ट्य होतं. याच स्पष्टवक्तेपणा आणि निर्भय भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरे सामान्य जनतेचे नेते म्हणून ओळखले गेले. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू, असंही मोदींनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
Prime Minister Narendra Modi Pays Tribute in Marathi to Late Shiv Sena Chief Balasaheb Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin : लाडक्या बहिणींची पुन्हा झाडाझडती, २२ ते २५ लाख महिलांच्या ई केवायसीची तपासणी होणार
- नाद कुणाचाही करा, पण देवाभाऊ यांचा नाही, जयकुमारे गाेरे यांचा अभिजीत पाटलांना इशारा
- नागपुरातील महापौर पदासाठी आरक्षणात घोळ, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
- कामटी जि.प. गटावरून वाद पेटला; सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका!