विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दहावे शीख गुरू श्री गुरु गोविंद सिंग यांच्या साहिबजाद्यांनी दिलेले बलिदान हे भारताच्या शौर्य, धैर्य आणि त्यागाचे अमर प्रतीक आहे. साहिबजादे मुघलांसमोर कधीही झुकले नाहीत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
भारत मंडपम येथे आयोजित वीर बाल दिन कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की, साहिबजाद्यांनी परिस्थितीच्या सर्व मर्यादा ओलांडत क्रूर मुघल सत्तेविरोधात उभे राहून धार्मिक कट्टरता आणि दहशतीच्या अस्तित्वालाच हादरा दिला. “साहिबजादे सामान्य मानव नव्हते, ते तपस्या आणि त्यागाचे सजीव प्रतीक होते. त्यांच्या विचारात आणि कृतीत दैवी तेज होते.
औरंगजेबला भारतात भीती पसरवून जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणायचे होते. त्यासाठी भारतीयांचे मनोबल तोडणे आवश्यक असल्याचे त्याला वाटत होते आणि म्हणूनच त्याने साहिबजाद्यांना लक्ष्य केले. मात्र औरंगजेब आणि त्याचे सेनापती हे विसरले की, साहिबजादे अन्यायासमोर कधीही झुकणारे नव्हते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
देशाने गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याचा ठाम निर्णय घेतला असल्याचे सांगत पंतप्रधानांनी भारतीयांच्या त्यागाच्या आणि पराक्रमाच्या स्मृती कधीही दडपल्या जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. “आता देशातील नायक आणि नायिकांना दुर्लक्षित केले जाणार नाही. म्हणूनच वीर बाल दिन संपूर्ण उत्साहाने साजरा केला जात आहे,” असे त्यांनी नमूद केले.
भाषिक विविधता ही देशाची ताकद असून तीच आपली ओळख आणि एकतेचे बळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
वीर बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद
कार्यक्रमात पंतप्रधानांनी वीर बाल पुरस्काराने सन्मानित झालेल्या बालकांशी संवाद साधला. देश आज त्या शूर बालकांचे स्मरण करत आहे, जे भारताच्या अदम्य धैर्य, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिनिधित्व करतात, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील अठरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील वीस बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी, सीमावर्ती भागात जवानांना चहा आणि नाश्ता देणारे श्रवण सिंग यांचा विशेष गौरव करण्यात आला. तामिळनाडूच्या व्योमा आणि बिहारच्या कमलेश कुमार यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला.
वीर बाल दिनाच्या माध्यमातून देश आपल्या इतिहासातील शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवत असल्याचा संदेश पंतप्रधानांनी दिला.
Sahibzade Never Bowed Before Mughals, Says PM Narendra Modi At Veer Bal Diwas Event
महत्वाच्या बातम्या
- विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळविण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
- पुण्यात आपचा एकला चलोचा नारा; १६५ पैकी १६४ जागांवर उमेदवार
- दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे नाराज प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राजकारणातील नैतिकता रसातळाला, भाजपाचा हल्लाबोल