मातोश्रीवरून पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन, पुन्हा ड्रोनच्या घिरट्या सुरू असल्याची तक्रार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यानंतर वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाभोवती ड्रोनच्या घिरट्या सुरू होत्या. कुणी नजर तर ठेवत नाही ना, असा संशय आल्याने ‘मातोश्री’ वरून थेट पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन गेला. मातोश्रीभोवती पोलिसांच्या सुरक्षेचे कडे असताना थेट नियंत्रण कक्षात फोन गेल्याने पोलिसही कामाला लागले. काही जणांना ताब्यात घेऊन नेमके प्रकरण तरी काय, याची रात्री उशिरापर्यंत पोलिस माहिती काढण्याचा प्रयत्न करीत होते. Matoshree

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे खेरवाडी येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाला वेगळी ओळख आहे. देश-विदेशातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक बड्या व्यक्ती मातोश्रीचे उंबरे चढल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वास्तव्य ‘मातोश्री’ मध्ये असून, आजही या वास्तूला तितकेच महत्त्व आहे.



विशेष म्हणजे पोलिसांच्या दृष्टीने धोका आणि इतर बाबींचा विचार करून तितकेच सुरक्षाकवच पुरविण्यात आले आहे. असे असतानाही बुधवारी एक ड्रोन या परिसरात घिरट्या घालताना नजरेस पडले. काहीतरी संशयास्पद वाटल्याने ‘मातोश्री’ वरून थेट पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन गेला.

कडक पोलिस बंदोबस्त असतानाही ‘मातोश्री’ वरून फोन आल्याचे कळताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. स्थानिक पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली असता, आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या एका प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडविल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ड्रोन उडविणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांनी परवानगी घेतली होती का? परवानगी होती किंवा नव्हती तरी ‘मातोश्री’ परिसरात ड्रोन का नेण्यात आले, याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

A call was made from Matoshree to the police control room.

महत्वाच्या बातम्या