संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित

विशेष प्रतिनिधी

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात बीड येथील विशेष मकोका न्यायालय ने मंगळवारी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार आहे.

या महत्त्वाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले, तर त्यांच्या वकिलांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने तब्बल १८०० पानांच्या दोषारोपपत्रातील संपूर्ण घटनाक्रम आरोपींना वाचून दाखवला.

आरोप निश्चित करताना न्यायालयाने तीव्र शब्दांत निरीक्षण नोंदवले. “खंडणी मागणे, मारहाण करणे, अपहरण करणे, हत्या करणे, खंडणीला आड येणाऱ्याला संपवणे असे दहशतीचे वातावरण तुम्ही सर्व आरोपींनी तयार केले आहे,” असे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले. खंडणी, कट, हत्या, पुरावे नष्ट करणे आणि एकत्रितपणे समान उद्देशाने गुन्हे केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचेही न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात मकोका कायदा अंतर्गतही गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माहिती देताना सांगितले की, वाल्मिक कराड अवादा कंपनीकडून खंडणी मागत होता. ही खंडणी मिळण्यास संतोष देशमुख अडथळा ठरत असल्याने त्यांचा कट रचून खून करण्यात आला. “न्यायालयाने आज आरोप निश्चित केल्याने आरोपींच्या सर्व प्रयत्नांना खीळ बसली आहे. पुढील सुनावणीत सरकारतर्फे सादर केलेली कागदपत्रे आरोपींना मान्य आहेत की नाही, याची प्रक्रिया होईल,” असे निकम यांनी स्पष्ट केले.

आरोप मान्य आहेत का, असा प्रश्न विचारताच वाल्मिक कराडने इतर आरोपींप्रमाणे चार वेळा आरोप मान्य नसल्याचे सांगितले. “मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवले आहे,” असे म्हणण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र न्यायाधीश पाटवदकर यांनी त्याला फटकारत, “जे विचारले आहे तेवढेच उत्तर द्या. जास्त बोलू नका,” अशी तंबी दिली.

दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी फॉरेन्सिक तपासासाठी पाठवलेल्या पुराव्यांच्या प्रती अद्याप मिळालेल्या नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. “जोपर्यंत पुराव्यांच्या प्रती मिळत नाहीत, तोपर्यंत ते स्वीकारता येणार नाहीत,” असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. या मागणीवरही पुढील सुनावणीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Charges Framed Against Valmik Karad, All Accused in Santosh Deshmukh Murder Case

महत्वाच्या बातम्या