Sharad Pawar : काँग्रेसचा हात की ठाकरे बंधूंची साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत संभ्रम

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sharad Pawar मुंबईमध्ये फारशी ताकद नसल्याने काेणाचा तरी आधार शाेधत असलेल्या शरद पवारांच्या (Sharad Pawar)  राष्ट्रवादी काॅंग्रेससमाेर ठाकरे गट आणि मनसेच्या युतीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. काॅंग्रेसचा हात हातात घ्यावा की ठाकरे बंधूंची साथ घ्यावी असा प्रश्न शरद पवार गटाला पडला आहे.



मुंबईसह विविध महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांचा मनसे पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. उध्दव ठाकरे यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडी फुटली आहे. मारामाऱ्या करणाऱ्या पक्षाबराेबर आम्ही जाणार नाही असे काॅंग्रेसने स्पष्ट केले आहे. त्यामुळे काॅंग्रेस स्वबळावर लढणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटासमाेर काेणासाेबत जायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईत ठाकरे बंधूच्या दाेन्ही पक्षाची ताकद आहे. शरद पवारांनाही मानणारा काही घटक मुंबईत आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले होते. मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर काही नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेले. यंदाच्या महापालिका निवडणुकीत शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा कल ठाकरे बंधू यांच्या युतीसोबत जाण्याचा होता. याबाबत शरद पवारांच्या उपस्थितीत बैठकाही झाल्या. मात्र त्यानंतर मंगळवारी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार की ठाकरेंसोबत जाणार हा संभ्रम निर्माण झाला आहे.याबाबत उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर म्हणाले की, मंगळवारी रात्री राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अध्यक्षा आणि आमच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक झाली. काही प्रस्ताव त्यांच्याकडून आले आहेत. त्यावर चर्चाही झाली आहे. विक्रोळी, चारकोप, दिंडोशी यासारख्या भागातील जागांची त्यांची मागणी आहे.

मात्र त्याठिकाणी आधीपासून स्थानिक नेतृत्व प्रयत्नशील आहे. त्यामुळे आम्ही त्यांना प्रस्ताव दिला आहे. आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे. ते काँग्रेससोबत बोलत असतील तर अयोग्य वाटत नाही. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यावा असं प्रत्येक पक्षाला वाटते. त्यामुळे जर त्यांना त्याठिकाणी न्याय मिळत असेल असं वाटतंय तर त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे असं त्यांनी सांगितले.दरम्यान, काही लोक सोयीनुसार बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतात. आज आम्ही जाणार त्यामुळे काहीजण काल जाऊन आले. महायुतीत काही आलबेल नाही. मित्रपक्षातील उमेदवार फोडण्याचं काम भाजपा आणि शिंदेसेना करत आहेत. त्यामुळे महायुतीत काय सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे असं सांगत सचिन अहिर यांनी महायुतीवर निशाणा साधला.

Confusion among Sharad Pawar’s NCP over whether it is Congress’s hand or Thackeray brothers’ support

महत्वाच्या बातम्या