एकतर सरकारचा तुकडा पडेल नाही तर माझ्या जीवाचा, मनाेज जरांगे यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

जालना : आंतरवालीमध्ये 30 मे रोजी रखरखत्या उन्हात बाजेवर बसत आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार ना काही जे होईल ते होईल. आता होणारे उपोषण खूप कडक होणार आहे. वेदनांचा काहीही विचार मी करणार नाही. एकतर सरकारचा तुकडा पडेल नाही तर माझ्या जीवाचा तुकडा पडेल या भूमिकेवर मी आलो आहे, असा इशारा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
आगामी आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर बाेलताना म्हणाले की, आपण सरकारला पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ दिला आहे. 29 मे रोजी 10 महिने पूर्ण होत आहेत. यापेक्षा किती जास्त वेळ सरकारला द्यायचा, गोरगरीब मराठ्यांच्याच लेकरांवर का अन्याय केला जातो? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आपल्या समाजाला काही मिळत नसेल तर कठोर पाऊल उचलावे लागतील.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अनेकांचे फोन आले पण मी फोनवर चर्चा करणार नाही. माझ्या समाजासाठी मी काम करत आहे. इतके क्रुर सरकार कधी आले नसेल. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज सधन आहे म्हणून त्यांना आरक्षण देता येणार नाही, असे सरकार सांगते. मराठवाड्यात पाणी नाही आणि आरक्षण नाही. तुम्हाला जर खेटायचे असेल तर आता आपण खेटूच. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे मंत्री आमच्याकडे येतात म्हणून त्यांना टार्गेट केले जाते. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी मिळत नाही. मराठ्यांकडे कोणता मंत्री जाऊ नये ही त्यांची भूमिका.


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता जे होईल ते होईल मी माझ्या शरीरांचा विचार करणार नाही. माझ्या समाजासाठी सर्व काही करण्याची माझी तयारी आहे. समाज बांधवांनी आंतरवालीकडे येऊ नये. सरकारला मराठा समाजाबद्दल माया असती तर त्यांनी आरक्षण दिले असते. सरकार केवळ बोलते आहे, समाजासाठी काही होणार नाही. मंडप न टाकता आम्ही हे उपोषण करणार आहोत. मला केवळ चर्चा नको आहे. तर माझ्या बांधवांना आरक्षण मिळणार आहे का? सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. पोलिस कट रचून आमच्यावर हल्ले करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाही, आणि आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
मराठ्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. सरकारकडून साधेसाधे काम केले जात नाही. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? पण ते केले नाही. ओबीसींनी न मागता त्यांच्यासाठी मंत्रालय स्थापन करण्यात आले. मराठा आणि कुणबी एक असून सुद्धा जीआर काढला नाही. आमच्या नोकऱ्या कोणी लाटल्या. सरकारने 50 वर्षांमध्ये आमचे वाटोळे का केले. आमच्या 5 पिढ्यांचे नुकसान कोण भरून काढणार, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

“Either the government will collapse or I will lose my life,” warns Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या