रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात पुण्यातून पाच आरोपी ताब्यात

विशेष प्रतिनिधी

पुणे ‘ बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबई येथील घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या मध्ये ५ आरोपींचा समावेश होता. या पाचही आरोपींना वारजे माळवाडी पोलिसांच्या पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले आहे. त्यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, हल्लेखोरांनी शेट्टी यांच्या इमारतीला लक्ष्य केले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. खबरदारी म्हणून, संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आणि रोहित शेट्टीच्या घराभोवती कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली.



घटनास्थळाभोवती बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. या संदर्भात आतापर्यंत रोहित शेट्टी किंवा त्याच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हा गोळीबार केवळ धमकावण्यासाठी होता की मोठ्या खंडणीसाठी होता, याचा पोलीस तपास करत आहेत.

विशेष म्हणजे अलीकडच्या काळात अनेक प्रमुख बॉलिवूड कलाकार सुरक्षा एजन्सींच्या रडारवर आहेत. ही घटना मुंबईतील अंडरवर्ल्डशी किंवा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई-गोल्डी ब्रार टोळीशी जोडली जाऊ शकते का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या संदर्भात, बाबा सिद्दीकी हत्याकांडातील फरार आरोपी शुभम लोणकरच्या अलिकडच्या कारवायांवरही पोलीस लक्ष ठेवून आहेत.

शुभम लोणकरने गेल्या आठवड्यात पुण्यातील एका प्रसिद्ध चित्रपट फायनान्सरकडून फोनवरून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच पैसे न दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली होती. या प्रकरणातील पीडित सनी नाना वाघचौरे यांनी पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात FIR दाखल केला आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, त्यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून खंडणीची मागणी करणारे कॉल आणि मेसेज आले होते.

Firing Outside Rohit Shetty’s Residence; Five Accused Detained from Pune