सगळ्या गोष्टींचा मजाक, नवीन करायचं नसेल ‘नवनिर्माण’चा अर्थ तरी काय? राज ठाकरे कार्यकर्त्यांवर संतापले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सगळ्या गोष्टींचा मजाक बनवला आहे. जर काही नवीन करायचं नसेल, तर पक्षाच्या नावात असलेल्या ‘नवनिर्माण’चा अर्थ तरी काय? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. दहिसर ते वांद्रे या परिसरातील विविध विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. गोरेगाव पश्चिम येथील एम्पायर बँक्वेट हॉलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट इशारा देताना म्हणाले की, तुम्ही खाली काय करता याची मला पूर्ण माहिती मिळते. कोण काय काम करतंय आणि कोण निष्क्रिय आहे, हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचत असतं. आता मला प्रत्येकाने नेमकं काय काम केलं हे पाहायचं आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे समजते. पक्षाच्या कामकाजात शिथिलता दिसून येत आहे.



बैठकीत सदस्य नोंदणीच्या कामाचाही आढावा घेतला. पक्षाच्या संघटनात्मक कामात कोण किती सक्रिय आहे, याची आकडेवारी लवकरच समोर येईल, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच येत्या 19 तारखेला पक्षाच्या पुढील कार्यक्रमासाठी तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवावा आणि पक्षाच्या कामात अधिक सक्रिय व्हावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

तुम्ही फक्त हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करता, पण महिलांसाठी त्यापलीकडे कोणते नवे उपक्रम राबवता? असा थेट सवाल त्यांनी महिला कार्यकर्त्यांना करत समाजाभिमुख उपक्रम राबविण्याची गरज आहे. पक्षाचे काम केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता समाजात सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

पक्षाच्या कामात ढिलाई सहन केली जाणार नाही. पुढील काळात संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना ठोस जबाबदाऱ्या दिल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

“If Nothing New Is Done, What’s the Meaning of ‘Navnirman’?” Raj Thackeray Slams Party Workers

महत्वाच्या बातम्या