दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा होती अंतिम टप्प्यात, शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर या विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे ठरले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी केला. Shashikant Shinde and Jayant Patil

जयंत पाटील यांनी सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत, अशी इच्छा अजित पवार यांचीही होती. त्या अनुषंगाने अनेक बैठका झाल्या होत्या. “अलीकडेच माझी आणि अजित पवारांची भेट झाली होती. त्यानंतर आमच्या पक्षातील काही नेत्यांनीही अजित पवार यांच्याशी चर्चा केली. एकत्र येण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी करून लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुणे तसेच इतर काही महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र निवडणुका लढलो. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही काही ठिकाणी ही आघाडी कायम आहे,” असे पाटील म्हणाले.



प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या भूमिकेला दुजोरा दिला. “महानगरपालिकांच्या निवडणुका आम्ही आघाडी करून लढलो. पुण्यासह काही जिल्हा परिषदांमध्येही आमची युती झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्याचे ठरले होते. त्या दिशेने आमची वाटचाल सुरू झाली होती,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजित पवार गटातील काही नेत्यांचा या विलीनीकरणाला विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार पुढील प्रक्रिया राबवली जाऊ शकली असती, असेही सूचित करण्यात येत आहे. मात्र, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ही संपूर्ण प्रक्रिया काही काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, पुढील काळात या विलीनीकरणाबाबत खासदार सुनेत्रा पवार तसेच अजित पवार यांचे दोन्ही पुत्र कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. त्यांच्या भूमिकेवरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील एकत्रीकरणाचा निर्णय मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार असल्याचे मानले जात आहे.

Merger Talks Between Two NCP Factions Were in Final Stage, Claim Shashikant Shinde and Jayant Patil

महत्वाच्या बातम्या