नोकरीचे आमिष दाखवून 21 वर्षीय तरुणीला शरिरसुखाची मागणी; 78 वर्षीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. दिवाकर गमे अटकेत

विशेष प्रतिनिधी

पुलगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रा. दिवाकर गमे (78) यांना एका 21 वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून पुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी गमे यांच्यावर पॉक्सो कायद्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ मार्च रोजी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली. Prof. Diwakar Game

प्रा. दिवाकर गमे हे राज्य शासनाच्या महाज्योती उपक्रमाचे माजी संचालक असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी स्थापनेपासून संबंधित आहेत. त्यांच्या अटकेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी २०२२ पासून गमे यांच्या संपर्कात आली होती. त्या वेळी तिचे वय २१ वर्षे होते. आरोपीने तिला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत वारंवार शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. गेल्या काही वर्षांपासून तो तिच्यावर असा दबाव टाकत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे आरोपीचे पीडित तरुणीच्या कुटुंबाशीही ओळखीचे संबंध होते. काही दिवसांपूर्वी गमे यांनी तरुणीला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले, त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. अखेर या छळाला कंटाळून तिने पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पुलगाव पोलिसांनी ७ मार्च रोजी सायंकाळी गमे यांना अटक केली. पोलिसांनी त्यांचा मोबाईल फोन जप्त केला असून त्यातून आणखी पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले करत आहेत.

प्रा. दिवाकर गमे हे अनेक दशकांपासून जिल्ह्यातील राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या संस्थांमध्ये अनेक बेरोजगार तरुण-तरुणी नोकरीच्या आशेने संपर्क साधत असतात. या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे गमे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे.

NCP (Ajit Pawar Faction) Leader Prof. Diwakar Game Arrested

महत्वाच्या बातम्या