अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा, गायिका अंजली भारतीचा निषेध

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भंडारा येथे आयोजित एका गायनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी बलात्कार विषयावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. संजय राऊत यांच्यासह विरोध पक्षाच्या नेत्यांनीही अंजली भारती यांचा निषेध केला.

भंडाऱ्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात अंजली भारती यांचे गायन सुरू होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यभरात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर संताप व्यक्त केला. बलात्कार या गंभीर विषयावर मत मांडताना त्यांचा मात्र असे करताना त्यांनी थेट अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केले. या विधानानंतर तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि पैसेही उधळले, ज्यामुळे या प्रकरणाची तीव्रता अधिकच वाढली आहे.



भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत अंजली भारती आणि आयोजकांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, “श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभे राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी देणे आणि त्यावर टाळ्या पडणे, हे समाजाच्या अधःपतनाचे भयावह चित्र आहे. मात्र, आमच्याकडे बाबासाहेबांनी दिलेले संविधानाचे शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा, ते आम्हाला चांगलेच ठाऊक आहे.”

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून अंजली भारती यांच्या विधानाचे समर्थन करण्यास नकार दिला आहे. राऊत म्हणाले, “मी ते वक्तव्य ऐकले नाही, पण जर कुणी एखाद्या महिलेविषयी, विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविषयी असे बोलले असेल, तर त्याचे समर्थन करता येणार नाही. अमृता फडणवीस या स्वतः एक कलाकार आहेत, संगीत क्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्यावर अशाप्रकारे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे.”

Outrage Over Objectionable Remarks Against Amruta Fadnavis; Singer Anjali Bharti Faces Backlash

महत्वाच्या बातम्या