भाजप खासदाराच्या भीमाशंकर दर्शनासाठी नियमाला बगल

विशेष प्रतिनिधी

मुंबई: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन बंद असताना, झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी प्रशासनाने नियमांना केराची टोपली दाखवली आहे. शनिवारी दुपारी २ वाजता दुबे यांनी हेलिकॉप्टरने येऊन विशेष दर्शन घेतल्याने प्रशासकीय दुजाभावावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



भीमाशंकर मंदिराच्या सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे मंदिर ९ जानेवारी ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. स्थानिक नागरिक, सर्वपक्षीय नेते आणि वारकरी संप्रदायाने भाविकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय मोठ्या मनाने स्वीकारला होता. इतकेच नव्हे तर, हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या ‘महाशिवरात्री’ उत्सवालाही भाविकांनी मंदिराबाहेरूनच दर्शन घेतले. मात्र, आज थेट हेलिकॉप्टरने आलेल्या खासदारांसाठी प्रशासकीय नियम पायदळी तुडवून मंदिराचे दरवाजे उघडले गेल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच खळबळ उडाली असून, व्हीआयपी दर्शनाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले. “प्रशासनाकडून दर्शनासाठी कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती, या घटनेबद्दल मला कोणतीही माहिती नाही,” असे सांगत त्यांनी या प्रकारापासून हात झटकले आहेत.

Rules Bent for BJP MP’s Bhimashankar Visit

महत्वाच्या बातम्या