Shiv Sena : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गळती, महानगरप्रमुख शिंदे गटात

विशेष प्रतिनिधी

नाशिक: नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर शिवसेना उबाठाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासंदर्भात संकेत देताच त्यांची तडकाफडकी महानगरप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली.



शिवसेना ठाकरे गटाने नाशिक महानगर प्रमुख पदावरुन विलास शिंदे यांना हटवत मामा राजवाडे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावर नियुक्ती केली आहे. खासदार संजय राऊत यांनी महानगरप्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती केली आहे अशी ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली. तसेच मामा राजवाडे यांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या महानगर प्रमुख नियुक्ती होताच मामा राजवाडे म्हणाले की, पक्षाने माझे ग्राऊंडवरील काम पाहून माझ्यावर जबाबदारी दिली. पक्ष सोडून जाणारे स्वार्थापोटी पक्ष सोडत आहे. कोणताही पक्ष संपत नसतो. पक्षातील नाराजांची नाराजी मी नक्की दूर करेन. पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार आहे. नाशिक महापालिकेवर मशाल हाती घेऊन भगवा फडकवणार आहे, असे त्यांनी म्हटले.

मामा राजवाडे म्हणाले की, पक्ष सोडणारे मलिदा खाण्यासाठी सत्तेत जात आहेत. पक्ष सोडणाऱ्यांना मंत्रिपद, त्यांच्या मुलांना आमदारकी आणि महापालिकेत संधी दिली, असे म्हणत त्यांनी बबनराव घोलप आणि सुधाकर बडगुजर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करणार आहे. मला कोणतेही आव्हान नाही, शिवसैनिकांच्या जोरावर काम सुरू राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

Shiv Sena Thackeray faction in priblem in Nashik, metropolitan chief Shinde joins the group

महत्वाच्या बातम्या