विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांच्या विधीमंडळातील वाढत्या गैरहजेरीवरून पक्षाने आता कडक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. विरोधकांना कमी लेखून निष्काळजीपणे वागू नका आणि सभागृहातील कामकाज गांभीर्याने घ्या, असा संदेश त्यांनी दिला आहे. तसेच विधिमंडळात वारंवार गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करून ते संबंधितांच्या हातात देण्यात आल्याचीही माहिती आहे.
यापुढे कोणताही आमदार किंवा मंत्री सभागृहात अनुपस्थित राहणार असेल, तर त्याला त्याचे लेखी कारण पक्षाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनाकारण गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंत्र्यांच्या उपस्थितीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांना आता सभागृहातील कामकाजाकडे अधिक गांभीर्याने पाहावे लागणार आहे.
भाजपने यासाठी नवीन पद्धत लागू केली आहे. सभागृहाचे कामकाज सकाळी सुरू झाल्यापासून सायंकाळपर्यंत सर्व आमदार आणि मंत्र्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असेल. यासाठी पाच आमदारांचा एक गट तयार करण्यात आला आहे. त्या गटातील एका आमदाराकडे उपस्थिती आणि कामकाजात सहभाग याची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित आमदार आपल्या गटातील सदस्य सभागृहात किती वेळ उपस्थित राहतात आणि कितपत सक्रिय असतात याचा अहवाल थेट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे देणार आहे.
दरम्यान, जर एखाद्या आमदार किंवा मंत्र्याला महत्त्वाच्या बैठकीसाठी किंवा अन्य कारणासाठी सभागृहातून अनुपस्थित राहावे लागले, तर त्याबाबत योग्य आणि लेखी कारण पक्षाला कळवावे लागेल. कोणतीही माहिती न देता अनुपस्थित राहिल्यास संबंधित आमदारावर पक्षाकडून कारवाई होणार आहे. तसेच मंत्र्यांच्या बाबतीत संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील योग्य ती कार्यवाही करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे आता विधिमंडळातील उपस्थितीबाबत आमदार-मंत्र्यांवर अधिक जबाबदारी येणार असल्याचे मानले जात आहे.
State President Ravindra Chavan Issues Stern Warning to Absentee MLAs
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका शहरातील वसतिगृहांपर्यंत; गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक
- गोकुळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 1200 सभासदांच्या पात्रतेवर सुनावणी
- एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन
- महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन