विशेष प्रतिनिधी
मुंबई: अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण लढाई केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नाही. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि समृद्ध महाराष्ट्र यासाठीची ही दीर्घकालीन लढाई आहे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.
सोशल मीडियावरून कार्यकर्ते आणि समर्थकांशी संवाद साधताना सस्नेह जय महाराष्ट्र, अशा शब्दांत आपल्या पोस्टची सुरुवात करत राज ठाकरे सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन केलं. यावेळची निवडणूक सोपी नव्हती, अचाट धनशक्ती आणि सत्तेच्या बळाविरुद्ध ही लढाई होती, असं स्पष्ट करत त्यांनी या परिस्थितीतही कार्यकर्त्यांनी दिलेल्या झुंजीचं कौतुक केलं.
राज ठाकरे म्हणतात, ही लढाई म्हणजे धनशक्ती आणि सत्ताशक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी होती. पण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मैदान सोडलं नाही. कठीण लढाईत मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि चिकाटी कौतुकास्पद आहे. निकाल काहीही असले तरी कार्यकर्त्यांनी दिलेली झुंज ही पक्षासाठी मोठी ताकद आहे.
मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही, याचं दुःख असल्याचं राज ठाकरे यांनी मान्य केलं. मात्र, पराभवामुळे खचून जाण्याची मनसेची परंपरा नाही. जे नगरसेवक निवडून आले आहेत, ते आपल्या-आपल्या क्षेत्रात सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषतः मराठी माणसाच्या विरोधात काहीही घडत असल्याचं दिसल्यास, हे नगरसेवक सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, ही लढाई केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नाही. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि समृद्ध महाराष्ट्र यासाठीची ही दीर्घकालीन लढाई आहे. अशा लढाया दीर्घ काळ चालतात आणि त्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक असतं, याचं भान कार्यकर्त्यांना आहे. मनसेचं अस्तित्वच या लढ्याशी जोडलेलं आहे.
निकालानंतर काय चुकलं, कुठे कमी पडलं आणि पुढे काय करायला हवं, याचं विश्लेषण आणि कृती सगळे मिळून करू. एमएमआर परिसर असो वा संपूर्ण राज्य, मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हीच मनसेची भूमिका राहील, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. निवडणुका येतील आणि जातील, पण आपला श्वास मराठी आहे, हे विसरायचं नाही, असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या मूळ भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं. लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया आणि नव्याने आपला पक्ष व संघटना उभारूया, अशा शब्दांत त्यांनी नव्या सुरुवातीचा निर्धार व्यक्त केला. मनपा निकालानंतर आलेल्या या पोस्टमधून पराभव स्वीकारतानाच पुढील लढाईसाठी सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश राज ठाकरे यांनी दिला आहे.
Money and Power vs Shiv Shakti, Raj Thackeray Praises Workers’ Fierce Fight
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन