Uddhav Thackeray’ : बंडखोरांची मनधरणी सुरू; सत्तेत आल्यानंतर योग्य जबाबदारी देण्याचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत बंडखोरी उफाळून आली आहे. पक्षांतर्गत नाराजी वाढू नये आणि बंडखोरांचे आव्हान थोपवता यावे, यासाठी आता सर्वच पक्षांकडून मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रचार, कार्यक्रमांचे आयोजन आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे सोपवत भविष्यात योग्य संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले जात आहे.Uddhav Thackeray

शिवसेना (ठाकरे गट) फुटीनंतरही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राजीनामे दिले. काहींनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली, तर काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेतही ही बंडखोरीचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला.Uddhav Thackeray



दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढत, मुंबई महापालिका शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. “चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाला फटका बसणार नाही याची काळजी घ्या. सत्तेत आल्यावर योग्य जबाबदारी दिली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिल्याची माहिती नाराज नेत्यांनी दिली आहे.

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एबी फॉर्मच्या वाटपात झालेल्या गोंधळामुळे अनेक पक्षांत असंतोष निर्माण झाला. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांऐवजी ऐनवेळी प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याने रोष उफाळला. भाजपने काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेमधून आलेल्यांना तिकीट दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.

या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून बंडखोरांनाही पुढील काळात संधी देण्याचे संकेत दिले जात आहेत. मुंबईत भाजपकडून माजी नगरसेविका व आरोग्य समितीच्या अध्यक्षा सुनीता यादव, माजी नगरसेवक सागर सिंह, दशा पटेल यांना भविष्यात योग्य संधी दिली जाईल, असे सांगण्यात आल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनीही नाराज नेत्यांना नंदनवन येथे बोलावून तोडगा काढत, पालिकेत सत्ता आल्यास योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे समजते.

१५ जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीचा फटका बसेल या भीतीने पक्षनेतृत्व अधिक सावध झाले असून, नाराजी दूर करून संघटना मजबूत ठेवण्यावर भर दिला जात आहे.

Rebel Outreach Begins, Promise of Key Roles After Power

महत्वाच्या बातम्या