Pune Municipal : पुणे महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी २६ डिसेंबरला जाहीर होणार!

विशेष प्रतिनिधी

पुणे : Pune Municipal  पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपची पहिली उमेदवार यादी २६ डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असली, तरी मंगळवारी कोणत्याही प्रमुख पक्षाची अधिकृत उमेदवार यादी जाहीर होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.Pune Municipal

भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. युतीसंदर्भात दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पहिली बैठक झाली असून, जागावाटपावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. शिवसेनेकडून काही जागांची प्राथमिक यादी भाजपला देण्यात आली असून, त्या जागांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. युतीत शिवसेनेला किती जागा देण्यात येणार, याकडे भाजपमधील इच्छुकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.Pune Municipal



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महापालिका निवडणुकीत भाजपकडून निवडून आलेल्या जागांवरील उमेदवारांची पहिली यादी २६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भाजपकडे सध्या १०५ माजी नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने या जागांवर कोणताही मोठा फेरबदल होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विद्यमान माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) येथून ११ माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर या नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, अन्य काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दुसरीकडे, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आजपासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू झाली असून, त्याचबरोबर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

शहरातील १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची या कार्यालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडी अधिक वेगाने घडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. उमेदवारी निश्चित करण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसात आमची कोअर कमिटीची बैठक होईल, त्यामुळे यादी २५ डिसेंबरनंतर होण्याची शक्यता आहे. अद्याप कोणतीही तारीख ठरलेली नाही. तारीख जाहीर केली जाईल, असे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.

BJP’s First List for Pune Municipal Polls to Be Out on December 26

महत्वाच्या बातम्या